भाजपाविरोधात काँग्रेसचे प्रियंकाअस्त्र; मायावती-अखिलेश यांनाही बसणार फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 01:12 AM2019-02-10T01:12:35+5:302019-02-10T01:13:09+5:30
मोदी सरकारने लोकप्रिय घोषणा करून २०१९ च्या निवडणुका जिंकण्याचे डावपेच आखल्यानेच काँग्रेसनेदेखील प्रियंका गांधी यांना पक्षाचे सरचिटणीस करून राजकारणात उतरवले आहे.
- धनाजी कांबळे
मोदी सरकारने लोकप्रिय घोषणा करून २०१९ च्या निवडणुका जिंकण्याचे डावपेच आखल्यानेच काँग्रेसनेदेखील प्रियंका गांधी यांना पक्षाचे सरचिटणीस करून राजकारणात उतरवले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश व देशातील इतर राज्यांतही राहुल व प्रियंका गांधी भाजपाला रोखण्यासाठी रान उठवतील, अशी शक्यता आहे. ज्या उत्तर प्रदेशातून दिल्लीच्या सत्तेचा मार्ग जातो, त्याच राज्याच्या पूर्व भागांत प्रियंका गांधी अधिक लक्ष देणार असल्याने आगामी निवडणुकीत सत्तेची गणिते बदलण्याची शक्यता आहे.
बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे दोघेही उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांत मायावती व अखिलेश यादव यांनी भाजपाला
पार पराभूत केले. भाजपाला आव्हान देण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी केल्याने काँग्रेस एकटे
पडण्याची शक्यता होती. त्यात मतांची
विभागणी झाल्याने भाजपालाच त्याचा फायदा होईल, या भीतीने काँग्रेसने प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवले आहे. विशेषत: भाजपाविरोधात देशात एक व्यापक आघाडी उभी केली जाईल, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. यावेळी मायावती व अखिलेश यादव हेही काँग्रेससोबत होते. मात्र, आता निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेस व भाजपाला वगळून मायावती आणि अखिलेश यांनी आघाडी केली आहे. त्याचा निश्चित परिणाम दलित, आदिवासी आणि यादव समाजाच्या मतांवर होईल. त्यामुळेच काँग्रेसने भाजपाला रोखण्यासाठी प्रियंका गांधी यांना राजकारणात उतरवले आहे. तसेच त्यांना पक्षाचे सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविली आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची छबी प्रियंका गांधी यांच्यामध्ये दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आलेला आहे. त्याचप्रमाणे मतदारांवरदेखील प्रियंका यांचा प्रभाव आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता बळावली आहे. प्रियंका यांच्या प्रभावी वक्तृत्वाचेही मतदारांना आकर्षण आहे.
‘प्रियंका फॅक्टर’ काँग्रेससाठी किती लाभदायी ठरतो, याबाबतची उत्सुकता असताना एका सर्वेक्षणात प्रियंकामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मतांचा टक्का नक्कीच वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे. प्रत्यक्षात प्रियंका गांधी यांची जादू किती चालते हे पाहणे औैत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपाने मात्र अपेक्षेप्रमाणेच नेहरू-गांधी घराणेशाहीचे हे आणखी एक उदाहरण आहे, अशी टीका केली आहे. प्रियंका गांधी कदाचित अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, तर राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवतील, असे जवळपास नक्की आहे. मायावती आणि अखिलेश यांच्याविषयी आदर असून, आमची लढाई भाजपाविरोधात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यामुळे मायावती आणि अखिलेश यांच्या आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
एकगठ्ठा मते वळविण्याचे कसब
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८0 जागा आहेत. त्यातील ५0 जागांची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर आहे. उत्तर प्रदेशात ब्राह्मण मतदार १५ टक्के व मुस्लिम मते २३ टक्के असून, त्यांच्यावर प्रियंका प्रभाव पाडू शकतील, असे काँग्रेसला वाटते.
उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ येतो आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राजकीय ताकदही उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातच आहे. त्यामुळे त्या दोघांची डोकेदुखी यामुळे वाढली आहे.