“७० वर्षांचं सोडून द्या, गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केलं ते सांगा”; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 04:47 PM2021-12-12T16:47:48+5:302021-12-12T16:48:35+5:30

पंतप्रधान मोदी जगभर फिरतात, पण शेतकऱ्यांना भेटण्यासाठी दहा किलोमीटर जाऊ शकत नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.

congress priyanka gandhi criticised centre modi govt over inflation and farmers protest | “७० वर्षांचं सोडून द्या, गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केलं ते सांगा”; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

“७० वर्षांचं सोडून द्या, गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केलं ते सांगा”; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Next

जयपूर: केंद्रातील मोदी सरकारवर काँग्रेस सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी हळूहळू वाढत जात असताना आरोप-प्रत्यारोपांना अधिक धार चढत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेत्या आणि महासचिव प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत, ७० वर्षांचे सोडून द्या. गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केले ते सांगा, असे आव्हान भाजपला दिले आहे. 

जयपूर येथील एका जनसभेला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारची धोरणे आणि वाढत्या महागाईविरोधात 'महागाई हटाओ' रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकार निवडक उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप करत, देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकार जाहिरातींवर खर्च करण्यात व्यस्त आहे, अशी टीका केली. 

पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत

स्वयंपाकाचा गॅस एक हजार रुपये, खाद्य तेल २०० रुपयांपेक्षा अधिक दरावर मिळत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. एक असे सरकार असते, ज्यांना लोकांचे भले करायचे असते. तर, दुसरे सरकार असते, ज्यांचा हेतू भ्रष्टाचार आणि जनतेची लूट करण्याचा असतो, अशी टीका करत, या सरकारमधील मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडले. ते अजूनही मंत्रिपदावर आहेत. उत्तर प्रदेश सरकार जाहिरातींवर कोट्यवधी खर्च करत आहे. मात्र, शेतकऱ्यांना खत पुरवठा करू शकत नाही. केंद्रातील सरकार असत्य, लोभी आणि लूट करणारे आहे, या शब्दांत प्रियंका गांधी यांनी हल्लाबोल केला. 

गेल्या ७ वर्षांत केलेल्या कामाचा हिशोब जनतेला द्यावा

केंद्रातील मोदी सरकार तुमच्यासाठी काम करत नाही. हे सरकार काही लोकांसाठीच काम करत आहे. पंतप्रधान मोदी ७० वर्षांची चर्चा करतात. ७० वर्षांचे जाऊ दे. गेल्या ७ वर्षांत काय केले याचा हिशोब त्यांनी द्यावा. पंतप्रधान जगभर फिरतात, पण शेतकऱ्यांना भेटण्यासाठी दहा किलोमीटर जाऊ शकत नाही, असा घणाघात प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना केला. 
 

Web Title: congress priyanka gandhi criticised centre modi govt over inflation and farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.