Coronavirus : "बोर्डाच्या परीक्षा रद्द करा किंवा..." प्रियंका गांधींनी CBSE ला फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 11:17 AM2021-04-09T11:17:04+5:302021-04-09T11:18:27+5:30
Coronavirus : देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या, १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून केली परीक्षा रद्द अथवा ऑनलाइन घेण्याची मागणी
देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत मे महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी वाढत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधीदेखील विद्यार्थ्यांच्या बाजूनं पुढे आल्या आहेत. कोरोनासारख्या या कठोर परिस्थितीत त्यांनी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षा देण्यास सांगितल्यामुळे प्रियंका गांधी यांनी CBSE बोर्डाला फटकारलं असून ते विद्यार्थ्यांविषयी बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
"सध्याच्या परिस्थितीत सीबीएसईसारख्या बोर्डांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास भाग पाडणे हे बेजबाबदारपणाचं आहे. बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा शेड्यूल केल्या पाहिजेत अथवा परीक्षा अशा प्रकारे घ्याव्यात की गर्दी असलेल्या केंद्रांमध्ये मुलांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसेल," असं प्रियंका गांधी म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सीबीएसई बोर्डाला फटकारलं.
It is downright irresponsible of boards like the CBSE to force students to sit for exams under the prevailing circumstances. Board exams should either be cancelled, rescheduled or arranged in a manner that does not require the physical presence of children at crowded exam centres
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 9, 2021
विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणी
सध्या देशभरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या १ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या करून मे मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करणं किंवा त्या ऑनलाइन पद्धतीनं घेण्याची मागणी केली आहे. परंतु सीबीएसई आणि काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याचं म्हटलं आहे.