‘कर्नाटकमध्ये 136 जिंकल्या, मध्य प्रदेशात 150 जागा जिंकू’, राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:55 PM2023-05-29T16:55:40+5:302023-05-29T16:55:56+5:30
आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत सर्व प्रदेशाध्यक्षांची बैठक पार पडली.
Congress Rahul Gandhi : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर काँग्रेसची नजर आता मध्य प्रदेश आणि राजस्थान निवडणुकीकडे आहे. मध्य प्रदेशात पक्षाला 150 जागा मिळतील असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या प्रश्नावर त्यांनी काहीही बोलणे टाळले.
या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पक्षाने तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या प्रदेश युनिटच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत राहुल गांधी आणि पक्षाचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपालही उपस्थित होते.
#WATCH | We had a detailed meeting right now and our internal assessment says that since we got 136 seats in Karnataka, we are now going to get 150 seats in Madhya Pradesh: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/9rQgiJBumY
— ANI (@ANI) May 29, 2023
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकात जे झाले, त्याचीच पुनरावृत्ती मध्य प्रदेशात होईल असा दावा केला आहे. ते म्हणाले, “बैठकीत आमची दीर्घ चर्चा झाली. आमचे अंतर्गत मूल्यांकन आहे की, कर्नाटकात 136 जागा मिळाल्या, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात 150 जागा मिळतील.”
यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत विचारले असता ते उत्तर न देता निघून गेले. पत्रकारांनी त्यांना विचारले की, यावेळीही कमलनाथ हे मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? त्यावर राहुल गांधी म्हणाले, "भाऊ, 150 जागा येणार आहेत." मुख्यमंत्री उमेदवाराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देता ते तेथून निघून गेले. यावेळी त्यांच्यासोबत कमलनाथही उपस्थित होते.