गुजरातेत दलितांच्या संमेलनाची काँग्रेस करतेय जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:10 PM2017-11-13T23:10:47+5:302017-11-13T23:10:47+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राज्यात दलितांचे मोठे संमेलन आयोजित करण्याच्या तयारीत आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राज्यात दलितांचे मोठे संमेलन आयोजित करण्याच्या तयारीत आहे. पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संमेलनाचा उद्देश दलितांच्या प्रश्नांवर चर्चा करून पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांचा समावेश करण्याचा आहे.
संमेलनाची जबाबदारी पक्षाचे नेते राजू यांच्याकडे आहे. तरीही या संमेलनाचे मुख्य कर्ते करविते सॅम पित्रोदा असल्याचे सांगितले जाते. अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी यांची राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दलितांच्या मागण्यांचा समावेश करण्याचा मुद्दा होता व राहुल गांधी यांनीही दलितांचे हित अबाधित राखण्यासाठी काँग्रेस प्रत्येक पातळीवर तयार असल्याचे आश्वासनही दिले होते.
राहुल गांधी यांनी दिलेल्या या आश्वासनानंतरच दलितांशी चर्चा केली जावी, असा पक्षाने निर्णय घेतला. जिग्नेश मेवानी यांनी या संमेलनासाठी दलितांच्या २० संघटनांची यादी दिली होती व त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासही सांगितले होते. गुजरातेत दलित मतदार सात टक्क्यांपेक्षाही जास्त आहेत. काँग्रेस त्या सगळ्यांनाच आपल्यासोबत घ्यायच्या प्रयत्नात आहे. संमेलनात वेगवेगळ्या भागांतून १०० पेक्षा जास्त दलित नेते, बुद्धिजिवी, डॉक्टर्स आदींना बोलवायची योजना आहे. सॅम पित्रोदा या सगळ्यांशी संवाद साधतील व त्यात निर्माण होणाºया मुद्यांचा समावेश जाहीरनाम्यात करतील. संमेलनाची तारीख अजून निश्चित झालेली नाही; परंतु राहुल गांधी गुजरातहून परतल्यानंतर ती ठरवली जाईल, असे कळते. काँग्रेस दलित, ओबीसी, पाटीदार आणि मुस्लिमांना संघटित करून भाजपवर हल्ल्याच्या तयारीत आहे.