आपविरोधात काँग्रेसची 'वसुली दिवस' मोहीम
By Admin | Published: October 14, 2016 04:11 PM2016-10-14T16:11:31+5:302016-10-14T16:11:31+5:30
दिल्लीकरांनी भरलेला कर पक्षाच्या प्रचारासाठी वापरण्यात आल्याचा विरोध करत काँग्रेसने आम आदमी पक्षाविरोधात मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - दिल्लीकरांनी भरलेला कर पक्षाच्या प्रचारासाठी वापरण्यात आल्याचा विरोध करत काँग्रेसने आम आदमी पक्षाविरोधात मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस 'वसुली दिवस' मोहीम सुरु करणार असून लोकांना त्यांच्या पैसा परत करण्याची मागणी करणार आहेत.
'दिल्लीकरांना त्यांचा पैसा परत मिळाला पाहिजे. हे अनैतिक असून सर्वोच्च न्यायालयाने आखलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात असल्याचं,' दिल्ली काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी बोलल्या आहेत. सरकारी पैशाचा वापर स्वत:च्या आणि पक्षाच्या उदात्तीकरणासाठी वापरण्यात येऊ नये अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे.
आम आदमी पक्षाने जाहिरातींवर केलेल्या खर्चाची माहिती मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाने समिती गठीत केली होती. आम आदमी पक्षाने दिल्लीकरांनी कर म्हणून भरलेला पैसा पंजाब आणि गोव्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरल्याचं समितीला आढळलं होतं. आम्ही 'वसुली दिवस' नावाने स्वाक्षरी मोहिम सुरु करणार असून लोकांना त्यांचा पैसा परत देण्यात यावा अशी मागणी करणार आहोत असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सांगितलं आहे.