काँग्रेसने भाजपाकडून आठ वर्षांनी हिसकावली गुरुदासपूरची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:57 AM2017-10-16T04:57:49+5:302017-10-16T04:58:02+5:30
भाजपाचे खासदार आणि अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या गुरुदासपूरची जागा काँग्रेसने आठ वर्षांनंतर भाजपाकडून हिसकावली.
गुरुदासपूर : भाजपाचे खासदार आणि अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या गुरुदासपूरची जागा काँग्रेसने आठ वर्षांनंतर भाजपाकडून हिसकावली. लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सुनील जाखड यांनी भाजपाच्या स्वर्ण सलारिया यांचा १ लाख ९३ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.
विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसने झेंडा रोवला होता. त्यानंतर गुरुदासपूरची पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची झाली होती. परंतु या निवडणुकीतही काँगे्रसने भाजपावर दणदणीत विजय मिळविला आहे. काँग्रेसचे जाखड यांना ४ लाख ९९ हजार ७५२ मते, तर भाजपाचे सलारिया यांना ३ लाख ६ हजार ५३३ मते मिळाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार मेजर जनरल (सेवानिवृत्त) सुरेश खजुरिया यांना २३ हजार ५७९ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपाकडून विनोद खन्ना यांनी गुरुदासपूर येथून १९९८, १९९९, २००४ आणि २०१४ मध्ये विजय मिळविला होता.
राहुल गांधी यांच्यासाठी ही दिवाळी भेट
भाजपाकडून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. या विजयामुळे काँग्रेसला उभारी मिळेल आणि २०१९ च्या निवडणुकीत पक्ष उत्तम कामगिरी करेल. अकाली दलाला लोकांनी नाकारले. आम आदमी पार्टीचा हा राजकीय नायनाट आहे.
- अमरिंदर सिंग, मुख्यमंत्री, पंजाब
हा विजय म्हणजे कसोटी
क्रि केट मॅच एका डावाने जिंकल्यासारखे आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही दिवाळी भेट आहे.
- नवज्योतसिंग सिद्धू,
कॅबिनेट मंत्री
केरळात मुस्लीम लीगचा विजय
तिरुवनंतपूरम : केरळात वेंगारा विधानसभा पोटनिवडणुकीत माकपचा पराभव करीत इंडियन युनियन मुस्लीम लीगने ही जागा सलग पाचव्यांदा जिंकली. या पक्षाचे उमेदवार केएनए खादर यांनी माकपचे पी.पी. बशीर यांचा २३,३१० मतांनी पराभव केला. खादर यांना ६५,२२७ मते, तर बशीर यांना ४१,९१७ मते मिळाली.