काँग्रेसने कर्नाटकच्या १४ आमदारांना मुंबईत हलविले

By admin | Published: June 7, 2016 07:43 AM2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30

कर्नाटकात ११ जून रोजी राज्यसभेच्या ४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ५ उमेदवार आहेत.

Congress shifted 14 Karnataka MLAs to Mumbai | काँग्रेसने कर्नाटकच्या १४ आमदारांना मुंबईत हलविले

काँग्रेसने कर्नाटकच्या १४ आमदारांना मुंबईत हलविले

Next

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- कर्नाटकात ११ जून रोजी होणारी राज्यसभा निवडणूक पुढे ढकलू नये, निवडणूक टाळल्यास अथवा पुढे ढकलल्यास घोडेबाजाराला उघड उत्तेजन मिळेल, अशी तक्रार घेऊन दिग्विजयसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. भाजपा व जनता दल (सेक्युलर)ने ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकात ११ जून रोजी राज्यसभेच्या ४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ५ उमेदवार आहेत.
काँग्रेसने जयराम रमेश, आॅस्कर फर्नांडिस आणि के. सी. राममूर्ती, तर भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि जद (से) ने बी. एम. फारूक यांना उमेदवारी दिली आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला ४५ मते हवीत. विधानसभाध्यक्ष वगळता काँग्रेसकडे १२२ मते आहेत. याचा अर्थ काँग्रेसच्या तिसऱ्या उमेदवाराला विजयासाठी पक्षाची ३२ अधिकृत मते मिळाल्यावर आणखी १३ मतांची आवश्यकता आहे. त्यासाठी १ अपक्ष व जद (से) च्या ५ आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याची माहिती हाती आहे.
कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीत धनशक्तीचा वापर कसा होतो आहे, या संबंधी एका वृत्तवाहिनीने नुकतेच एक स्टिंग आॅपरेशन प्रसारित केले. यानंतर, घोडेबाजाराला घाबरलेल्या काँग्रेसने सुरक्षिततेचा उपाय म्हणून अपक्ष आमदार अशोक खेनीसह यशवंतपूरचे आमदार सोमाशेखर यांच्या नेतृत्वाखाली १४ आमदार मुंबईला रवाना केले.
या आमदारांचा मुक्काम सध्या मुंबईच्या जेडब्लू मॅरियट हॉटेलात
आहे. हे आमदार १0 जून रोजी बंगलुरूला परतणार असून, ११ जून रोजी मतदानात भाग घेतील. त्यापूर्वी निवडणूक पुढे ढकलू नये व मतदान नियोजित वेळीच व्हावे, या मागणीसाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाचे दार ठोठावले.
>विधानसभेतले पक्षीय संख्याबळ
कर्नाटक विधानसभेत काँग्रेस १२३, भाजपा ४४, जद (से) ४0, अपक्ष ९, अन्य छोटे पक्ष ७ व नामनियुक्त १ अशा २२५ सदस्यांचे संख्याबळ आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या उमेदवाराला १३, भाजपाला १ तर जद(से)उमेदवाराला १0 मतांची गरज आहे. सर्व पक्षांची नजर अपक्ष ९, अन्य पक्षांच्या ७ आमदारांवर आहे. अशा वातावरणात घोडेबाजाराला उत्तेजन मिळू नये, यासाठी काँग्रेसने १४ आमदारांना मुंबईला हलवले, तर भाजपाने ही निवडणूकच पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

Web Title: Congress shifted 14 Karnataka MLAs to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.