काँग्रेस, सपा, लोकदलाची उत्तर प्रदेशात महाआघाडी?
By admin | Published: December 26, 2016 01:02 AM2016-12-26T01:02:59+5:302016-12-26T01:02:59+5:30
उत्तर प्रदेशात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बिहारच्या धर्तीवर काँग्रेस, सपा आणि राष्ट्रीय लोकदल महाआघाडीच्या स्वरूपात निवडणुकीत उतरणार आहेत.
शीलेश शर्मा /नवी दिल्ली
उत्तर प्रदेशात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बिहारच्या धर्तीवर काँग्रेस, सपा आणि राष्ट्रीय लोकदल महाआघाडीच्या स्वरूपात निवडणुकीत उतरणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाआघाडीला जेडीयू आणि राजद हे पक्षही सहकार्य करण्यासाठी तयार होत असल्याचे दिसत आहे. अर्थात, उत्तर प्रदेशात जेडीयू, राजदचे फारसे अस्तित्व नसले तरी त्यांचे समर्थन गैर भाजप मतांना एकत्रित करण्यासाठी मदत करू शकते.
या महाआघाडीबाबत सहमती झाली असली तरी कोण किती जागा लढविणार हे अद्याप ठरलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँगे्रसने १५० जागांवर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव सपाच्या समोर ठेवला आहे; पण सपा यासाठी तयार नाही. काँगे्रस आणि सपा यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा आकडा १५० वरून ११५ वर आला आहे. गुलाम नबी आझाद आणि प्रशांत किशोर हे मुलायमसिंह यांच्याशी चर्चा करीत आहेत, तर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे थेट मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या संपर्कात आहेत.
दुसरीकडे अजितसिंह हे मुलायमसिंह यांच्या संपर्कात आहेत. यावरून हे संकेत मिळत आहेत की, आगामी दोन आठवड्यांत ही महाआघाडी आकाराला येईल. याच महाआघाडीच्या कारणास्तव काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केली नाहीत. दुसरीकडे काँगे्रसने पंजाबमध्ये आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
अन्य पक्षांची झोप उडाली
काँग्रेस, सपा आणि राष्ट्रीय लोकदल एका व्यासपीठावर येण्याच्या वृत्ताने भाजप नेतृत्वाची झोप उडविली आहे.
बसपाच्या प्रमुख मायावतीही यामुळे बेचैन आहेत. त्यांना आता याची भीती वाटत आहे की, ज्या सोशल इंजिनीअरिंगच्या जोरावर निवडणूक रणनीती आखण्यात येत होती त्यालाच या महाआघाडीमुळे धक्का बसू शकतो, तसेच मुस्लिम मतदारही त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो.