यूपीमध्ये काँग्रेसचा तंबू थंड! आदित्यनाथ सक्रिय; लोकसभा निवडणुकीसाठी अन्यांचीही तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:28 AM2018-01-03T01:28:36+5:302018-01-03T01:28:49+5:30
राहुल गांधी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष झाल्यानंतरही उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात काँग्रेस पक्ष पुन्हा आळस झटकून कामाला लागेल आणि सत्तासंपादनाचे प्रयत्न सुरू करेल, अशी अजिबात शक्यता दिसत नाही. पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसमधील मरगळ कमी होण्याची चिन्हे नाहीत किंवा तसे प्रयत्नही त्या पक्षातले लोक करताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष झाल्यानंतरही उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात काँग्रेस पक्ष पुन्हा आळस झटकून कामाला लागेल आणि सत्तासंपादनाचे प्रयत्न सुरू करेल, अशी अजिबात शक्यता दिसत नाही. पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसमधील मरगळ कमी होण्याची चिन्हे नाहीत किंवा तसे प्रयत्नही त्या पक्षातले लोक करताना दिसत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपा, समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी यांनी मात्र उत्तर प्रदेशात जोरदार तयारी सुरू केली आहे, पण काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते उत्तर प्रदेशबाबत थंडपणे बसून आहेत, असे काँग्रेसच्या राज्यसभेतील एका सदस्याने खासगीत सांगितले.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून तर सोनिया गांधी रायबरेलीतून लोकसभेवर निवडून येतात. मात्र काँग्रेसचे हे दोन दिग्गज नेते ज्या राज्यातून निवडून गेले आहेत तेथील काँग्रेसची संघटना फार खिळखिळी झाली आहे. दुसºया बाजूला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला आश्वासने देण्याचा सपाटाच लावला आहे. संघ स्वयंसेवक व भाजपाचे कार्यकर्ते यांना ब्लॉक स्तरावर अनेक जबाबदाºया सोपविण्यात येत आहेत. पण त्याची गांभीर्याने दखल घेऊ न काँग्रेस नेते व कार्यकर्ते काही करत आहेत, असे चित्र मात्र नाही.
बसपा, सपा लागले कामाला
मायावती यांनी राज्याचा दौरा करून दलित मतदारांना पुन्हा पक्षाच्या जवळ आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. राज्यात ठिकठिकाणी सभाही घेत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या समाजवादी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी येत्या ८ जानेवारीला पक्षनेत्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत आमदार, खासदार तसेच पराभूत उमेदवार तसेच महत्त्वाचे नेते सहभागी होतील.