आसाराम तर बहाणा, मोदींवर निशाणा; काँग्रेसकडून मोदी, आसारामचा व्हिडिओ ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 15:31 IST2018-04-25T15:31:50+5:302018-04-25T15:31:50+5:30
व्हिडिओमध्ये मोदी आणि आसाराम एकमेकांची स्तुती करताना दिसत आहेत

आसाराम तर बहाणा, मोदींवर निशाणा; काँग्रेसकडून मोदी, आसारामचा व्हिडिओ ट्विट
नवी दिल्ली: अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला जोधपूर कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन आसाराम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मोदी आणि आसाराम एकत्र दिसत आहेत. 'माणूस त्याच्या संगतीवरुनच ओळखला जातो,' असं ट्विट करत काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसनं मोदी आणि आसारामचा व्हिडिओ ट्विट करत अप्रत्यक्षपणे मोदींना लक्ष्य केलं आहे. यानंतर काही ट्विटर वापरकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांबरोबरचे आसारामचे फोटोदेखील पोस्ट केले आहेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आसारामचे आशीर्वाद घेत असतानाच फोटो काहीजणांनी ट्विटरवर शेअर केला आहे. दिग्विजय सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आसारामच्या आश्रमासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लैंगिक अत्याचार प्रकरणात आसारामला 2013 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल पश्चाताप व्यक्त केला होता.
"A man is known by the company he keeps" - Aesop's fables #AsaramVerdictpic.twitter.com/CTOQ8HKJ1O
— Congress (@INCIndia) April 25, 2018
जोधपूर मध्यवर्ती कारागृह न्यायालयानं अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आसाराम बापूसह तीन आरोपींना दोषी ठरवलं आहे, तर दोन जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. आसाराम, शिल्पी व शरदचंद्र या तिघांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. प्रकाश व शिवा या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर शिल्पी आणि शरद या दोषींना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.