काँग्रेस आज नव्या लढ्याचा बिगुल फुंकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2015 10:07 PM2015-09-19T22:07:57+5:302015-09-19T22:07:57+5:30
केंद्रातील मोदी सरकारने भूसंपादनावर पुन्हा अध्यादेश काढला नसला तरी आता मागच्या दाराने राज्य सरकारांची मदत घेऊन तोच कायदा पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
केंद्रातील मोदी सरकारने भूसंपादनावर पुन्हा अध्यादेश काढला नसला तरी आता मागच्या दाराने राज्य सरकारांची मदत घेऊन तोच कायदा पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा हाच डाव उधळून लावण्याकरिता आज रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशातील शेतकऱ्यांना एकजूट केले जाणार आहे.
सरकारच्या भूसंपादन दुरुस्ती विधेयकाच्या विरोधातही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याच मैदानावरुन आंदोलन छेडले होते. इतर पक्षांच्या मदतीने या मुद्यावरून सरकारवर दबाव आणण्यात काँग्रेस यशस्वी ठरली असून त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती करण्याची या पक्षाची मनिषा आहे. या किसान सन्मान रॅलीत राहुल गांधी नव्या संघर्षाची घोषणा करणार असून काँग्रेसच्या राजकारणातील ही नवी खेळी असणार आहे.
या संपूर्ण संघर्षाचे श्रेय राहुल यांना दिले जाणार आहे. तसेच या माध्यमाने आपली शेतकरी व्होटबँक बळकट करण्याची या पक्षाची योजना आहे. आपला पारंपरिक मतदार गमावलेल्या काँग्रेसने राजकारणात पुन्हा वर्चस्व स्थापित करण्यासाठी शेतमजुरांवर लक्ष केंद्रित केले आहे.
राहुल गांधी यांनी अज्ञातवासातून परत आल्यापासून आजपर्यत केलेले दौरे याचे साक्षीदार आहेत. राहुल हे या काळात शेतकऱ्यांमध्येच राहिले. काँग्रेसच्या पाठिशी उभे राहणारे शेतकऱ्यांचे हे बळ किसान सन्मान रॅलीत बघायला मिळेल,अशी अपेक्षा आहे.
केंद्र सरकारला जमिनी हिसकावू देणार नाही
- काँग्रेसचे दिग्गज नेते ए.के. अॅन्टनी, मोतीलाल वोरा, भूपेंद्र हुड्डा आणि आर.एस. सुरजेवाला यांनी तर शनिवारपासूनच मोदी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला. शेती उत्पादन समर्थन मूल्यांचे आकडे सादर करून मोदी सरकार खोटारडे आणि शेतकरी विरोधी असल्याचे त्यांनी सिद्ध केले.
- एक डाव पराभूत झाल्यानंतर आता राज्य सरकारांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची केंद्राची इच्छा असून सरकारला असे करण्यापासून रोखावे लागेल, असे या नेत्यांनी स्पष्ट केले.
- शेतकऱ्यांनी पहिला संघर्ष जिंकला असून आता दुसरी लढाई लढायची आहे आणि शेतकऱ्यांच्या दिल्ली रॅलीने नवा लढा सुरू होणार आहे. यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीतून सर्वाधिक गर्दी होणार आहे. इतर राज्यांमधील शेतकऱ्यांनाही रॅलीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे.