काँग्रेस साजरा करणार पंतप्रधान मोदींचा वाढदिवस; राष्ट्रीय बेरोजगारी दिवसाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 09:25 PM2021-09-15T21:25:32+5:302021-09-15T21:28:14+5:30
१७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस; काँग्रेस-भाजपमध्ये जुंपणार
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काँग्रेस देशभरात साजरा करणार आहे. १७ सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. हा दिवस युथ काँग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करणार आहे. बेरोजगारी दिवसाच्या अंतर्गत काँग्रेसकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल.
दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ असं आश्वासन नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्याआधी दिलं होतं, याची आठवण युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी करून दिली. 'रोजगाराचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी आज रोजगाराबद्दलच गप्प आहेत. देशातील बेरोगजारीचा दर २.४ टक्क्यांवरून १०.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तरुणांना रोजगार देण्यात सरकार असमर्थ ठरलंय,' अशी टीका श्रीनिवास यांनी केली.
17 सितंबर को देश को पूरे देश में युवा कांग्रेस मनाएगी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस..
— Srinivas BV (@srinivasiyc) September 10, 2021
मौका है उस व्यक्ति के जन्मदिन का जिसने हम दो-हमारे दो के तहत देश के हर युवा को बनाया बेरोजगार,
आइये मिलकर मनाते है #NationalUnemploymentDaypic.twitter.com/d5VsgtlJ5x
'१७ सप्टेंबरला देशात युवा काँग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस साजरा करेल. ज्या व्यक्तीनं हम दो हमारे दोच्या अंतर्गत देशातील तरुणांना बेरोजगार केलं, त्यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस आहे. यानिमित्तानं राष्ट्रीय बेरोजगारी दिवस साजरा करूया,' असं आवाहन श्रीनिवास यांनी केलं आहे.
एकीकडे काँग्रेसनं बेरोजगारी दिवस साजरा करण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे भाजपनं मोदींचा जन्मदिन साजरा करण्यासाठी कोरोना लसीकरण अभियानावर विशेष जोर दिला आहे. या दिवशी कार्यकर्त्यांनी लसीकरण मोहीम राबवावी, अशा सूचना पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्या आहेत. यासाठी भाजपनं ६ लाख ८८ हजार स्वयंसेवकांची फौज तयार केली आहे.