काँग्रेस या कठीण काळातूनही बाहेर पडेल!

By admin | Published: June 18, 2017 12:03 AM2017-06-18T00:03:43+5:302017-06-18T00:03:43+5:30

काँग्रेसमध्ये सक्रिय असणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री मोहसीना किडवई यांची ‘लोकमत’चे दिल्ली प्रतिनिधी शीलेश शर्मा यांनी घेतलेली विशेष मुलाखत...

Congress will come out of this difficult time too! | काँग्रेस या कठीण काळातूनही बाहेर पडेल!

काँग्रेस या कठीण काळातूनही बाहेर पडेल!

Next

काँग्रेस पक्ष सोडून जाताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लक्ष्य करणे आता नित्याचे झाले आहे, पण नव्या पक्षात भाव मिळावा, म्हणून हे असे केले जाते, हे उघड आहे. आजपेक्षाही वाईट परिस्थितीला काँग्रेस पक्षाने या आधी तोंड दिले आहे, परंतु आम्ही संघर्ष करून त्यातून बाहेर पडलो व बाहेर पडूदेखील, असा विश्वास गांधी कुटुंबाच्या विश्वासातील व निकटवर्तीय मोहसीना किडवई यांनी व्यक्त केला. ६० वर्षांपेक्षा अधिक काळ काँग्रेसमध्ये सक्रिय असणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री मोहसीना किडवई यांची ‘लोकमत’चे दिल्ली प्रतिनिधी शीलेश शर्मा यांनी घेतलेली विशेष मुलाखत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबद्दल तुमचे मत काय? तीन वर्षांच्या कामकाजाकडे तुम्ही कशा पाहता?
पंतप्रधानांनी भारतीय राज्यघटनेवर त्यांचा विश्वास आहे की नाही, हे आधी स्पष्ट करावे. जे काही सुरू आहे, त्यावरून सरकार भारताला हिंदू राष्ट्र बनवू पाहत आहे, असे वाटते. अशा परिस्थितीत देशातील मुस्लिमांबाबत ते काय विचार करतात? गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांच्या विचारसरणीवर त्यांचा विश्वास आहे की नाही, मोदीजीही त्याच विचारसरणीचे समर्थन करतात काय? ते गांधीजींच्या नावावर राजकारण करतात, परंतु त्यांच्या कार्यपद्धतीत कुठेही गांधीजींच्या विचारांची झलक दिसत नाही. हिंदू-मुस्लीम भेदभाव सुरू आहे. ‘सब का साथ सब का विकास’ अशी घोषणा दिली जाते, परंतु वास्तवात चित्र काही वेगळेच आहे. गांधींजी अहिंसेचे पुजारी होते, परंतु आज तशी परिस्थिती आहे का? खूप बोलले जात आहे. मात्र, वास्तवात काहीही होताना दिसत नाही. पंतप्रधान जे मोठमोठे दावे करतात, ते सर्व काय या तीन वर्षांत झाले? आज केवळ ढोल वाजविला जात आहे, काम काडीचेही नाही. केवळ खोटे दावे केले जात आहेत, परंतु हे सर्व कुठपर्यंत चालेल. वस्तुस्थिती ही आहे की, काँग्रेसने देशाचा विकास केला. भाजपा आणि संघ तर हिंदू-मुस्लीम, मंदिर-मशीद यात गुंतले होते आणि आजही ते तेच करीत आहेत, परंतु हा देश वेगळ्या विचारांचा आहे. येथे सांप्रदायिक शक्ती मोठी खेळी करू शकत नाही. देशाचा मतदार ज्या दिवशी हिशेब घेईल, त्या दिवशी तो त्यांना धूळ चारल्याशिवाय राहाणार नाही.
हल्ली पक्षात असंतोषाचे वातावरण आहे. लोक पक्ष सोडून जात आहेत. अनेक जुन्या नेत्यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सर्व जण या परिस्थितीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार ठरवत आहेत. लोक त्यांच्या कार्यपद्धतीवर संतुष्ट नाहीत, हे खरे आहे काय ?
लोक राहुल यांच्यामुळे पक्षातून बाहेर जात आहेत, असे म्हणणे एकदम चुकीचे आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी कधी नव्हती? एवढा मोठा पक्ष आहे, वैचारिक मतभिन्नता आणि प्रतिस्पर्धा तर असणारच. मात्र, पूर्वी मतभेद एकत्र बसून सोडविण्याचे प्रयत्न होत होते. जिल्ह्याचा मुद्दा जिल्हा पातळीवर, प्रदेशचा मुद्दा प्रदेश पातळीवर सोडविला जाई. आज मात्र असे होत नाही. प्रत्येक जबाबदारी ही काय राहुल यांचीच आहे? मग एवढी मोठी संघटना कशासाठी? जिल्हाध्यक्ष आणि प्रभारी सरचिटणीस या सगळ्यांची जबाबदारी अशी आहे की, त्यांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नांची उत्तरे शोधावीत. दुर्दैवाची बाब अशी की, वेगवेगळ्या पदांवर असलेले आमचेच लोक त्यांच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडत नाहीत. मला हे विचारायचे आहे की, लोक पक्षाचा त्याग नेमका याच वेळेस का करीत आहेत? आम्ही सत्तेत नाहीत व आम्ही संघर्ष करीत आहोत, एवढेच त्याचे कारण आहे का? जो कोणी पक्ष सोडून जात आहे, त्याला काँग्रेस का सोडतोय, हे काही तरी सांगावेच लागते. मग तो राहुल यांचे नाव घेतो, कारण तसे केले की, तो जेथे कुठे जातो, तेथे त्याला चांगला भाव मिळावा.
पक्षात नेतृत्वाबरोबर संवाद जवळपास संपला आहे, अशी पक्षात चर्चा आहे. यावर आपले मत काय आणि त्यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार धरता?
माझे म्हणणे असे आहे की, ही काही कोणा एकाची जबाबदारी नाही. यासाठी सगळी संघटना जबाबदार आहे. आम्हा सगळ्यांनाच याची जबाबदारी घ्यावी लागेल. जो ज्या पदावर आहे, त्याने त्याच्या मर्यादेत कार्यकर्त्यांशी संवाद वाढवला पाहिजे. यातून छोटे-मोठे प्रश्न आपोआप सुटतात. ज्या परिस्थितीतून आम्ही प्रवास करीत आहोत, तो खूप महत्त्वाचा आहे. आम्ही जिल्हा, प्रदेश किंवा केंद्रीय स्तरावर कुठेही असलो, तरी ही वेळ आपापसांतील मतभेदांत गुंतण्याची नाही, तर ते मतभेद दूर करून पक्षाला बळकट कसे करता येईल, याचा विचार करण्याची आहे. आजपेक्षाही वाईट परिस्थितीला पक्षाने या आधी तोंड दिले आहे; परंतु आम्ही संघर्ष करून त्यातून बाहेर पडलो व बाहेर पडूदेखील.
राज्यांचे प्रभारी महासचिव राज्याराज्यांमध्ये गटबाजीला चिथावणी देतात, असा आरोप नेहमी केला जातो. यावर तुमचे मत काय?
ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली त्यांनी पक्षाचे हित वैयक्तिक हितापेक्षा महत्त्वाचे मानले पाहिजे. त्यांनी कोणत्या विशिष्ट गटाला पाठिंबा देऊ नये. एवढेच काय, सोनियाजी आणि राहुल यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. माझे म्हणणे असे आहे की, पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. निर्णय कोणताही घ्या, पण पक्षाच्या हिताचा. हाच आमचा विचार असला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे, काही प्रकरणांत नेतृत्वाला दिली जाणारी माहिती तटस्थतेने दिली जात नाही.
गेल्या काही दिवसांत जे नेते काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेले, त्या बहुतेकांनी असा आरोप केला आहे की, पक्षाचे वरिष्ठ नेते आम्हाला भेटत नाहीत व आमचे म्हणणे काय आहे, ते ऐकत नाहीत. यावर तुमचे मत?
असा आरोप करणे आता नेहमीचेच झाले आहे. पक्षाला सोडून जा आणि सोनियाजी व राहुल यांना लक्ष्य करा. ‘राहुल भेटत नाहीत,’ असे जे म्हणतात, त्यांना राहुल देशभर दौरे करून, प्रत्येक राज्यात नेते व कार्यकर्त्यांना भेटत असल्याचे दिसत नाही?

गांधी कुटुंबाच्या विश्वासातील व निकट संपर्कातील मोहसीना किडवई आज ८५ वर्षांच्या असून, ६० पेक्षा जास्त वर्षे त्या काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय आहेत. किडवई उत्तर प्रदेश सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. नंतर त्या केंद्रात मंत्री, काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या सदस्य होत्या. आजही काँग्रेसच्या महत्त्वाच्या निर्णयांत त्यांचा सल्ला घेतला जातो. स्वभावाने सरळ असल्या, तरी कामाबद्दल त्या ढिलेपणा सहन न करणाऱ्या आहेत. राजकारणाचा स्तर घसरल्यामुळे जनतेत लोकप्रतिनिधींबद्दलचा आदरही खालावला आहे. यामुळे त्या दु:खी आहेत.

Web Title: Congress will come out of this difficult time too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.