"काँग्रेसवाले म्हणतील मोदी एप्रिल फूल करताहेत, पण..."; PM मोदींचा 'वंदे भारत' ट्रेनवरुन काँग्रेसवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 06:20 PM2023-04-01T18:20:37+5:302023-04-01T18:22:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भोपाळमध्ये मध्य प्रदेशसाठीच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
भोपाळ-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भोपाळमध्ये मध्य प्रदेशसाठीच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. मोदींच्या उपस्थितीत राणी कमालापती रेल्वे स्थानकावरुन वंदे भारत ट्रेन रवाना झाली. मध्य प्रदेशला आज आपली पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मिळाली आहे. यामुळे भोपाळ ते दिल्लीचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. ही ट्रेन प्रोफेशनल्स, तरुण, व्यावसायिक इत्यादींसह अनेकांसाठी नव्या सुविधा घेऊन येणार आहे, असं मोदी म्हणाले.
"आधुनिक भारतात नव्या व्यवस्था निर्माण होत आहे. नव्या परंपरा बनत आहेत. आजचा कार्यक्रम देखील याचं एक उत्तम उदाहरण आहे. आज ज्या रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनला हिरवां कंदील दाखवला जात आहे. त्याच रेल्वे स्टेशनच्या लोकापर्णाचं भाग्य मला प्राप्त झालं होतं. रेल्वेच्या इतिहासात असं खूप कमी वेळा घडलं असेल की एकाच रेल्वे स्थानकावर इतक्या कमी कालावधीत एखाद्या पंतप्रधानाची दुसऱ्यांदा भेट घडावी", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
"मोदी म्हणजे एप्रिल फूल करत असेल"
मोदींनी या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना आपल्या भाषणात काँग्रेसवरही निशाणा साधला. "जेव्हा या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला गेल्याची बातमी उद्या छापली जाईल तेव्हा आमचे काँग्रेसचे मित्र १ एप्रिलच्या निमित्तानं असं नक्की म्हणतील की मोदी आहे म्हणजे एप्रिल फूल बनवलं असेल. पण तुम्ही स्वत: आज सगळे पाहात आहात. १ एप्रिल रोजीच ही ट्रेन रवाना होत आहे. हे आपल्या कौशल्य, सामर्थ्य आणि आत्मविश्वासाचं प्रतिक आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला आधीच निर्माण करण्यात आलेलं रेल्वे नेटवर्क हाती मिळालं होतं. इच्छा असती तर इतक्या वर्षात रेल्वेचा वेगानं विकास होऊ शकला असता. पण राजकीय फायद्यासाठी रेल्वेच्या विकासाचा बळी दिला जात होता. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही उत्तर-पूर्व भागात रेल्वेचं नेटवर्क नाही. २०१४ साली जेव्हा मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हाच मी ठरवलं होतं की आता असं चालणार नाही. रेल्वेचा कायापालट झालाच पाहिजे. गेल्या ९ वर्षात आम्ही सातत्यानं त्यादृष्टीनं काम केलं आहे आणि भारताच्या रेल्वे नेटवर्कला जगातील सर्वश्रेष्ठ नेटवर्क कसं बनवता येईल यादृष्टीनं आम्ही काम करत आहोत, असंही मोदी म्हणाले.