गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाठिंबा देणार - हार्दिक पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 01:32 PM2017-10-27T13:32:09+5:302017-10-27T13:32:37+5:30
गुजरातमधील विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा देणार असल्याचं पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने स्पष्ट केलं आहे.
अहमदाबाद - गुजरातमधील विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा देणार असल्याचं पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने स्पष्ट केलं आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पाटीदार समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे असं त्याने हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितलं.
पाटीदार समाजाला ओबीसीचा दर्जा द्यावा आणि सरकारी नोकरी व शिक्षण क्षेत्रात आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान मी राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. या भेटीत सकारात्मक चर्चा होईल आणि आमच्या मागण्या मान्य केल्या जातील असा विश्वास हार्दिक पटेलने व्यक्त केला. या भेटीनंतर कॉंग्रेसला पाठिंबा देण्याबाबत अधिकृत घोषणा करू असं त्याने सांगितलं.
हार्दिक पटेल यांना नुकतीच काँग्रेसने ऑफर दिली होती. हार्दिक पटेल यांना उमेदवारी देण्याची तयारीही काँग्रेसने दर्शवली होती. तर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ते काँग्रेसला पाठिंबा देणार अशी चर्चा होती. अखेर ते कॉंग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे गुजरातमधील राजकीय चित्र बदलले आहे.