‘काँग्रेसला कायद्याचा खरा अर्थ शिकवेन’
By Admin | Published: May 14, 2016 02:27 AM2016-05-14T02:27:23+5:302016-05-14T02:27:23+5:30
‘काँग्रेसला माझ्याविरुद्ध जे काही करायचे आहे ते करू द्या, पण कायद्याचा खरा अर्थ काय आहे हे मी काँग्रेसला शिकविणार आहे,’ अशा शब्दांत भाजपाचे खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे.
नवी दिल्ली : ‘काँग्रेसला माझ्याविरुद्ध जे काही करायचे आहे ते करू द्या, पण कायद्याचा खरा अर्थ काय आहे हे मी काँग्रेसला शिकविणार आहे,’ अशा शब्दांत भाजपाचे खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे.
स्वामी यांनी राज्यसभेत अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्याबद्दलचे जे दस्तऐवज दाखविले होते, ते सर्व बोगस आहेत असा दावा करून काँग्रेसने स्वामी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस पराभूत पक्ष आहे. मी काँग्रेस नेत्यांना नॅशनल हेरॉल्डप्रकरणी एकटे पाडले आणि संसदेत त्यांचा पर्दाफाश केला. त्यामुळे ते माझ्यावर चिडलेले आहेत. माझ्याविरुद्धचा हक्कभंग प्रस्ताव येईल तेव्हा मी त्यांना दस्तऐवज देईन,’ असे स्वामी म्हणाले. ‘हेलिकॉप्टर सौद्याबाबतचे दस्तऐवज सत्यापित केलेले नाहीत, असे काँग्रेस नेते आधी सांगत होते आणि आता हे दस्तऐवजच खोटे असल्याचे ते सांगत आहेत. मी काँग्रेसच्या नेत्यांना खरा कायदा काय आहे हे शिकवेन, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)