राहुल गांधींसाठी त्यानं केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 03:49 PM2019-07-02T15:49:36+5:302019-07-02T15:51:56+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्यानं स्वतःला लटकवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्यानं स्वतःला लटकवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयासमोरच तो आत्महत्या करत असल्याचं पाहून लोकांना धक्काच बसला. हा प्रकार पाहिल्यानंतर उपस्थित इतर काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिकांनी त्याला झाडावरून खाली उतरवलं. राहुल गांधींनी राजीनामा परत घ्यावा अन्यथा मी स्वतःला लटकवून घेऊन आत्महत्या करेल, अशी भावनाच त्यानं व्यक्त केली आहे.
राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर तो परत घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर दबाव बनवला आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्तेही धरणं आंदोलनाला बसून राहुल गांधींनी राजीनामा मागे घेण्याची मागणी करत आहेत. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठकीत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र कार्यकारणी समितीने राहुल यांनी राजीनामा देऊ नये, असा सल्ला दिला. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत पराभवावर चिंतन करण्यात आलं.
Delhi: A Congress worker attempted suicide by trying to hang himself outside Congress Office. He says, "Rahul Gandhi should take back his resignation else I will hang myself." pic.twitter.com/AhoClvzEPk
— ANI (@ANI) July 2, 2019
या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी एकमताने फेटाळला होता. कार्यकारणीच्या बैठकीआधी राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात पोहचले तेव्हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मनमोहन सिंग यांनीही राहुल यांना राजीनामा देऊ नका असं सांगितले होते.
तसेच तुम्ही अध्यक्ष नसाल तर कोण अध्यक्ष होणार? असा सवाल करत मनमोहन यांनी निवडणुकीत जय-पराजय होत असतो त्यासाठी राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगितले. त्यानंतरही राहुल गांधी यांनी कार्यकारणीच्या बैठकीत राजीनामा सादर केला. त्यावर कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी मागील 5 वर्षात राहुल गांधी यांनीच नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे, असं सांगितले होते.