हिंदूंना विभाजित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, लिंगायत समाजाच्या मुद्द्यावरून भाजपाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 10:48 AM2018-03-20T10:48:08+5:302018-03-20T10:48:08+5:30
काँग्रेस सरकारनं कर्नाटक विधानसभेत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कर्नाटक सरकारने यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यानं भाजपानं काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
बंगळुरू- काँग्रेस सरकारनं कर्नाटक विधानसभेत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कर्नाटक सरकारने यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यानं भाजपानं काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. सिद्धरामय्या सरकारच्या या निर्णयानंतर जोरदार गोंधळ सुरू झाला आहे.
भाजपानं या निर्णयावर टीका केली आहे. तसेच कर्नाटकमध्ये हिंदूंना विभाजित करण्याचं काम काँग्रेस करत असल्याचा आरोपही केला आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. गौडा म्हणाले, ऑगस्ट 2014मध्ये महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. परंतु केंद्रातील यूपीए सरकारनं तो प्रस्ताव झिडकारला आहे. सिद्धरामय्या यांनी याची माहिती नाही काय ?, असा सवालही सदानंद गौडा यांनी विचारला आहे.
कर्नाटक सरकारचा हा निर्णय म्हणजे हिंदूंचं धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे कर्नाटकातील राजकारण प्रभावित होऊ शकतो. लिंगायत समाजाला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठीच काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपानं केला आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा हेसुद्धा लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करतात. कर्नाटकात लिंगायत/वीरशैव समाजाची लोकसंख्या 17 टक्के आहे. काँग्रेस शासित कर्नाटकमध्ये भाजपा हा पारंपरिक मतदार आहे. काँग्रेस दोन समाजांत फूट पाडा आणि राज करा ही रणनीती अवलंबते आहे, असा आरोप भाजपा महासचिव पी. मुरलीधर राव यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.