सीबीआय मुख्यालयासमोर काँग्रेसची जोरदार निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 04:10 AM2018-10-27T04:10:49+5:302018-10-27T04:10:54+5:30
सीबीआयच्या संचालकांना घरी बसवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने शुक्रवारी दिल्लीसह देशभर सीबीआय कार्यालयांवर जोरदार निदर्शने केली.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : सीबीआयच्या संचालकांना घरी बसवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने शुक्रवारी दिल्लीसह देशभर सीबीआय कार्यालयांवर जोरदार निदर्शने केली. दिल्लीत राहुल गांधींसह अनेकांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडले. चौकीदार चोर है या घोषणेने निदर्शकांनी दिल्लीतील सीबीआय कार्यालयाचा परिसर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला
देशाचा चौकीदार म्हणविणाराच चोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्य दडविण्याचा, त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतील. परंतू काँग्रेस सर्व घोटाळे उजेडात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तिथे दिला. या निदर्शनांमध्ये अहमद पटेल, अशोक गेहलोत, वीरप्पा मोईली, रणदीप सुरजेवाला, आनंद शर्मा आदी काँग्रेस नेते तसेच भाकपचे नेते डी. राजा, तृणमूल काँग्रेसचे सर्व खासदार, शरद यादव हे विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनी यावेळी अगदी छोटेसे भाषण केले. तिथे ते म्हणाले की, आम्ही चौकीदाराला चोरी करू देणार नाही. राफेल व्यवहारात मोदी यांनी अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपयांचा फायदा करून दिला आहे. आलोक वर्मा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर राहुल यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.
>अंबानी पळून गेले तर..?
त्यांनी सांगितले की, राफेल घोटाळ्यातील सत्य उजेडात येईल या भीतीपोटी मोदी यांनी वर्मा यांच्यावर कारवाई केली आहे. मोदी यांनी भ्रष्टाचार केला असून अनिल अंबानींना मदत केली आहे. नीरव मोदी, मेहुल चोकसी जसे देशाचे पैसे घेऊन विदेशात पळून गेले तशीच कृती अनिल अंबानी कशावरून करणार नाहीत अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.