सर्व पोलीस ठाणी माहिती ग्रीडशी जोडणार
By admin | Published: March 17, 2016 12:04 AM2016-03-17T00:04:13+5:302016-03-17T00:04:13+5:30
गुन्हे आणि गुन्ह्यांसंबंधीची आकडेवारी गोळा करणे शक्य व्हावे यासाठी देशभरातील सर्व पोलीस ठाणी एका माहिती ग्रीडशी जोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
नवी दिल्ली : गुन्हे आणि गुन्ह्यांसंबंधीची आकडेवारी गोळा करणे शक्य व्हावे यासाठी देशभरातील सर्व पोलीस ठाणी एका माहिती ग्रीडशी जोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तथापि पोलीस ठाणी माहिती ग्रीडशी नेमकी केव्हा जोडण्यात येणार, याबाबतची माहिती सरकारतर्फे देण्यात आलेली नाही.
गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्यावेळी ही बाब स्पष्ट झाली. या प्रणालीचे ‘गुन्हा आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली (सीसीटीएनएस) प्रकल्प’ असे नामकरण करण्यात आले आहे, असे चौधरी यांनी दर्डा यांना सांगितले.
ही माहिती ग्रीड संचालित करण्यासाठी संबंधित राज्यांच्या सिस्टिम इंटिग्रेटर्सची मदत घेण्यात येईल. राज्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांना हँड होल्डिंग प्रशिक्षण प्रदान करतील. केंद्र सरकार चालू वित्त वर्षापर्यंत सीसीटीएनएस प्रकल्पाचा संपूर्ण खर्च सहन करेल. या प्रकल्पाद्वारे राज्यांच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये संगणक, हार्डवेअर/सॉफ्टवेअर, नेटवर्किंग क्षमता निर्माण करण्यात येईल, असे चौधरी म्हणाले. (प्रतिनिधी)