तरुणाईला खेळांशी जोडणे म्हणजे राष्ट्रनिर्माण : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 06:00 PM2020-08-29T18:00:56+5:302020-08-29T18:15:14+5:30

खेळांमधून चारित्र्यवान पिढी निर्माण होते.

Connecting youth to sports is the motto of the Nation Building :President Ramnath Kovind | तरुणाईला खेळांशी जोडणे म्हणजे राष्ट्रनिर्माण : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

तरुणाईला खेळांशी जोडणे म्हणजे राष्ट्रनिर्माण : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

googlenewsNext
ठळक मुद्दे‘व्हर्च्युअल’ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे : 'देशात क्रीडा संस्कृती विकसित करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. मला आनंद आहे की अलिकडच्या काळात कॉपोर्रेट, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्था क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक करु लागल्या आहेत. खेळांमधून चारित्र्यवान पिढी निर्माण होते. तरुणाईला खेळांशी जोडणे म्हणजेच राष्ट्रनिर्माण होय. याच पद्धतीने क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक झाल्यास २०२८ मध्ये आॅलिम्पिक पदक विजेत्या पहिल्या दहा देशांमध्ये येण्याचे देशाचे लक्ष्य गाठता येईल,' असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी (दि. २९) केले. 
आंतरराष्ट्रीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनी दरवर्षी राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, ध्यानचंद, द्रोणाचार्य अणि तेनसिंग नोर्गे हे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन २०२० चे हा सोहळा आॅनलाईन घेण्यात आला. यावेळी राष्ट्रपती बोलत होते. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यावेळी उपस्थित होते. देशभरातील पुरस्कार विजेत्यांनी आपापल्या राज्यात स्थानिक क्रीडा अधिकाºयांकडून पुरस्कार स्विकारले. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथे खेळाडू आणि प्रशिक्षकांनी पुरस्कार स्विकारले.  
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, '' कोविडमुळे यंदा आॅलम्पिंक स्पर्धा रद्द झाल्याचा परीणाम खेळाडूंच्या मनोबलावर होण्याची शक्यता आहे. मात्र या स्थितीतही खेळाडूंना आॅनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. आजचा पुरस्कार सोहळा आॅनलाईन घेण्यामागेही खेळाडूंचा उत्साह कायम ठेवण्याची भूमिका आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये कब्बडी, मल्लखांब यासारख्या देशी खेळांपासून बास्केटबॉल, रोईंगपर्यंतच्या वीसपेक्षा क्रीडा प्रकारातले खेळाडू आहेत. यावरुन देशात सर्व प्रकारच्या खेळांना उत्तेजन मिळत असल्याचे दिसत आहे. खेळांमधून देशवासियांच्या भावना उल्हासित होतात. देशाला जोडण्याचे, एकसंध राखण्याचे काम खेळातून साधले जाते.


तत्पुर्वी राहुल आवारे, दत्तू भोकनळ, सुयश जाधव यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. मनिका बात्रा यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ टेनिस प्रशिक्षक नंदन बाळ यांना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे सर्वजण पुण्यातून पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते.

पुरस्कार विजेत्यांच्या भावना

‘‘देशातील मानाचा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद झाला आहे. माझे आई-वडील, प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार यांचा माझ्या यशात मोलाचा वाटा आहे. गेल्या दहा-बारा वर्षांच्या कष्टाचे चीज या पुरस्काराने झाले. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असून आता आॅलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे लक्ष्य मी निश्चित केले आहे.’’ 
 - राहुल आवारे, (कुस्ती)

...........

‘‘ग्रामीण भागातून येऊन देशपातळीवरील मानाचा पुरस्कार मला प्राप्त झाला याचा आनंद आहे. आतापर्यंत केलेल्या संघर्षाचे फळ पुरस्काराच्या रुपाने मिळाले. रोईंग (नौकानयन) हा ग्रामीण भागात फारस माहित नसलेला खेळ आहे. मात्र, मला खेळात पहिल्यापासून रुची असल्याने मी माझी आवड जोपसली होती. भविष्यातही देशाला आंतरराष्ट्रीय पदके मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल.’’ 
- दत्तू भोकनळ, (रोईंग)

.......

‘‘मी दोन्ही हाताने दिव्यांग असलो तरी मी कधी त्याबद्दल तक्रार न करता माझ्याजवळ जे आहे त्यावर लक्ष दिल्यानेच मला आजचे यश मिळाले. अथक मेहनतीमुळे खेळामधील सर्वाेच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याचे माझे स्वप्न पूर्ण होऊ शकले. पॅरालंपिक स्पर्धांच्या उणीवेमुळे आपल्याकडचे प्रतिभावान दिव्यांग खेळाडू पुढे येऊ शकत नाहीत. ही परिस्थिती बदलण्याकरिता पॅरालंपिक स्पर्धांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.’’ 
- सुयश जाधव (जलतरण)

 ...... 


 ‘‘टेबलटेनिसमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणारी पहिली खेळाडू होण्याचा सन्मान मला मिळाला हा माझ्या जीवनातील अभिमानस्पद क्षण आहे. अनेक वर्षांच्या परिश्रमामुळे ही किमया साध्य झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्याबद्दल साशंकता आहे. मात्र ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल.’’
 - मनिका बात्रा (टेबल टेनिस) 
... 

 

‘‘यापुर्वी सन २००२ आणि २००८ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारासाठी माझे नामांकन झाले. परंतु, प्रत्यक्ष पुरस्कार मिळण्यासाठी २०२० उजाडावे लागले. साहजिकच यामुळे मला आनंद झाला आहे. नवी पिढी घडवण्याच्या माझ्या कामाची दखल घेतल्याने मला प्रोत्साहन मिळाले आहे. भविष्यातही जोमाने तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची भूमिका मी पार पाडत राहीन.’’ 
- नंदन बाळ (टेनिस)

Web Title: Connecting youth to sports is the motto of the Nation Building :President Ramnath Kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.