अनंतनागमधील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे आयएस कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 03:15 PM2018-06-22T15:15:16+5:302018-06-22T15:15:16+5:30
अनंतनागमधील श्रीगुफारा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - अनंतनागमधील श्रीगुफारा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चकमकीत ठार मारलेल्या दहशतवाद्यांचा खतरनाक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.
जम्मू काश्मीरचे डीजीपी एस.पी. वैद्य यांनी या दहशतवाद्यांचा इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ठार मारण्यात आलेले सर्व दहशतवादी काश्मीरमधील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून, या दहशतवाद्यांचा आयएसजेके या संघटनेशी संबंध असल्याचे समोर आल्याने संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या माहितीमुळे इस्लामिक स्टेट जम्मू काश्मीरमध्ये हातपाय पसरत असल्याच्या शंकेला बळ मिळाले आहे.
Encounter at Khiram Srigufara on , two terrorists down, firing still continues. Unfortunate we lost one colleague of J&K Police.
— Shesh Paul Vaid (@spvaid) June 22, 2018
श्रीगुफारा येथील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा होणे, हे लष्करासाठी मोठे यश मानण्यात येत आहे. गेल्या वर्षी सात नोव्हेंबरमध्ये जम्मू काश्मीरमधील जकूरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली होती. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला वीरमरण आले होते.
इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू काश्मीर ही आयएसआसएचचीच एक उपशाखा असल्याचे मानले जाते. ही संघटना भारतातील तरुणांना इस्लामच्या नावावर भडकवून त्यांना देशविरोधी कारवायांत गुंतवण्याचे काम करते. भारतात आयएसचे अस्तित्व नसल्याचे भारत सरकारने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र आज समोर आलेल्या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.