दहशतवाद्यांशी संबंध, जम्मू-काश्मीरमध्ये चार अधिकारी बडतर्फ, ३ वर्षांत ५४ जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:13 IST2023-11-22T16:10:06+5:302023-11-22T16:13:07+5:30
Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी समर्थक कृत्यांमध्ये कथितपणे गुंतल्याचा आरोपाखाली चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांशी संबंध, जम्मू-काश्मीरमध्ये चार अधिकारी बडतर्फ, ३ वर्षांत ५४ जणांवर कारवाई
जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी समर्थक कृत्यांमध्ये कथितपणे गुंतल्याचा आरोपाखाली चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये निसार उल हसन (सहाय्यक प्राध्यापक, मेडिसिन, एसएमएचएस रुग्णालय, श्रीनगर), कॉन्स्टेबल अब्दुल मजीद भट, उच्च शिक्षण विभागातील प्रयोगशाळा वाहक अब्दुल सलाम राथर आणि शिक्षण विभागातील शिक्षक फारुख अहमद मीर यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांना घटनेतील कलम ३११ नुसार बडतर्फ करण्यात आलं आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये सरकारी खात्यांमध्ये काम करताना कथितपणे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना मदत केल्याच्या आरोपाखाली गेल्या ३ वर्षांमध्ये ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. बडतर्फ करण्यात आलेले अधिकारी हे भारत सरकारकडून वेतन घ्यायचे. मात्र पाकिस्तानी दहशतवाद्यांना रसद पुरवायचे.
यावर्षी जून महिन्यामध्ये काश्मीर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी, महसूल विभागाचे एक अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला कथितपणे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसाठी फंड गोळा केल्याच्या आरोपाखाली नोकरीतून बडतर्फ करण्यात आले होते.