१५५ देशांच्या पाण्याने राममंदिराचा अभिषेक; ४० देशातून आले अनिवासी भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 10:41 AM2023-04-24T10:41:55+5:302023-04-24T11:13:41+5:30

आठ देशांचे राजदूत, ४० देशांतील अनिवासी भारतीयांची उपस्थिती

Consecration of Ram temple with water of 155 countries in ayodhya | १५५ देशांच्या पाण्याने राममंदिराचा अभिषेक; ४० देशातून आले अनिवासी भारतीय

१५५ देशांच्या पाण्याने राममंदिराचा अभिषेक; ४० देशातून आले अनिवासी भारतीय

googlenewsNext

अयोध्या : अक्षय तृतीयेच्या दिवशी अयोध्येतील राममंदिराचा १५५ देशांच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला. यात अमेरिकेतील १४ मंदिरे आणि १२ नद्यांच्या पाण्याचाही समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आठ देशांचे राजदूत, ४० देशांतील 
अनिवासी भारतीय अयोध्येत आले होते. 

यात ताजिकिस्तानचा ताज मोहम्मद यांचाही समावेश होता. बाबरच्या जन्मभूमीतील  कश्क-ए-दरिया या नदीसह अनेक मुस्लीम देशांतील नद्यांचे पाणी त्यांनी पाठविले आहे. मणिराम छावणीच्या सभागृहात सकाळी १० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश यांनी ‘भारत जय जगत’ ही नवी घोषणा दिली. दिल्ली भाजपचे माजी आमदार विजय जॉली व श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जॉली म्हणाले, “जलाभिषेकसाठी १५५ देशांतून पाण्याचे कलश अयोध्येत आणण्यात आले. यात उझबेकिस्तानची चिरचिक नदी, ताजिकिस्तानची वख्श नदी, युक्रेनची डनिस्टर, रशियाची व्होल्गा, मॉरिशसमधील गंगा तलाव व हिंदी महासागरातील पाण्याचाही समावेश आहे.

पाणी मिळविण्यासाठी लागले ३१ महिने...
“आमच्या जलाभिषेक कार्यक्रमासाठी इतक्या देशांतून पाणी गोळा करायला ३१ महिने लागले. स्टॉकहोम येथील आशिष ब्रह्मभट्ट यांनी कोरोनानंतरच्या पहिल्या विस्तारा फ्लाइटमध्ये पाणी पाठवले. आम्ही युक्रेन व रशियासह चीन, पाकिस्तान व अफगाणिस्तान येथूनही पाणी आणले, असे जॉली यांनी सांगितले.

अयोध्येत काम सुरू असलेल्या राममंदिराच्या अभिषेकासाठी विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी पाणी आणले होते. 

 

Web Title: Consecration of Ram temple with water of 155 countries in ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.