नेताजींच्या आड काँग्रेसला बदनाम करण्याचे कारस्थान
By admin | Published: January 24, 2016 02:27 AM2016-01-24T02:27:45+5:302016-01-24T02:27:45+5:30
पक्षाचे नेते आनंद शर्मा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सरकारने दस्तावेज खुले करण्याचे संकेत दिले त्याचवेळी काँग्रेसने सर्व फाईल्स सार्वजनिक करा जेणेकरून
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
पक्षाचे नेते आनंद शर्मा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सरकारने दस्तावेज खुले करण्याचे संकेत दिले त्याचवेळी काँग्रेसने सर्व फाईल्स सार्वजनिक करा जेणेकरून संपूर्ण सत्य जनतेसमक्ष येईल अशी मागणी केली होती. या मुद्द्यावर अनेक प्रकारचे राजकारण आणि प्रचार करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक शंकेचे वातावरण निर्माण केले जात आहे आणि नेताजींचा मृत्यू आणि संबंधित घटनाक्रमांबाबत देशवासीयांची दिशाभूल करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने शनिवारी पुन्हा हैदराबादेतील दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मोदी यांना थेट लक्ष्य करीत त्यांचे विचारच दलितविरोधी आहेत. ते दलितांबद्दल सहानुभूती दाखविण्याचे केवळ ढोंग करीत असून वास्तव याच्या अगदी विपरीत आहे, असा घणाघाती आरोप या पक्षाने केला. सोबतच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स खुल्या करण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोदी सरकार काँग्रेसला बदनाम करण्यासाठी नेताजींच्या आड षड्यंत्र रचत असल्याचा दावाही काँग्रेसने केला. काही निवडकच फाईल्स सार्वजनिक करण्याला काँग्रेसचा कधीही पाठिंबा नव्हता.
महत्त्वाचे दस्तावेज नष्ट केल्याचा संशय : तत्पूर्वी नेताजींची पणतू चंद्रकुमार बोस यांनी सांगितले की, सत्य दडवून ठेवण्यासाठी काँग्रेसच्या काळात काही महत्त्वाचे दस्तावेज नष्ट करण्यात आले असावेत असे आम्हाला वाटते. यासंदर्भात ठोस दस्तावेजी पुरावे आमच्याकडे आहेत. सरकारने रशिया, इंग्लंड, जर्मनी आणि अमेरिकेत ठेवलेले दस्तावेज खुले करावेत.
पर्दाफाश करणार : चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला जात असून या कारस्थानामागे नेमके कोण लोक आहेत त्यांचा पर्दाफाश काँग्रेस करेल. एवढेच नाहीतर या लोकांविरुद्ध कठोर कारवाईचेही प्रयत्न केले जातील, असा इशारा आनंद शर्मा यांनी दिला. काँग्रेसने नेताजींच्या फाईल्समधील सत्य दडवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.