सैन्याने रचलेला राजीव गांधी सरकार पाडण्याचा कट
By Admin | Published: October 4, 2015 11:51 AM2015-10-04T11:51:33+5:302015-10-05T12:23:48+5:30
१९८७ मध्ये सैन्याने राजीव गांधी सरकार पाडण्याचा कट रचला होता असा खळबळजनक खुलासा सैन्याचे निवृत्त आर्मी कमांडर पी एन हून यांनी केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - १९८७ मध्ये सैन्याने राजीव गांधी सरकार पाडण्याचा कट रचला होता असा खळबळजनक खुलासा सैन्याचे निवृत्त आर्मी कमांडर पी एन हून यांनी केला आहे. विशेष म्हणजे सैन्याच्या या कटात सरकारमधील काही ज्येष्ठ नेतेही सहभागी होते असे हून यांचे म्हणणे आहे.
पी एन हून यांनी 'अनटोल्ड ट्रूथ' या पुस्तकात राजीव गांधी सरकारविरोधात सैन्याने रचलेल्या कटाचा खुलासा केला आहे. शीख दंगलींमध्ये राजीव गांधींनी निष्काळजीपणा दाखवला होता. तसेच सरकारमधील काही नेतेही राजीव गांधींवर नाराज होते. १९८७ मध्ये हून हे पश्चिम विभागाचे आर्मी कमांडर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी माझ्या हाती एक पत्र लागले होते, या पत्रात सैन्याने तीन निमलष्करी जवानांच्या तुकड्या मागवल्या होत्या. या तीन तुकड्या दिल्लीकडे कुच करणार होत्या असा दावा हून यांनी केला आहे.याप्रकाराची माहिती पंतप्रधान राजीव गांधी व तत्कालीन केंद्रीय मुख्य सचिव गोपी अरोरा यांनाही दिली होते असे हून यांनी म्हटले आहे. राजीव गांधी सरकारमधील मंत्री विद्याचरण शुक्ला यांनादेखील सैन्याच्या हालचालींची माहिती होती व यासाठी ते स्वतः माझी भेट घ्यायला आले होते असा उल्लेख हून यांनी केला आहे. तत्कालीन सैन्यप्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी आणि सैन्याचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस एफ रोडरीगुएज हे या कटात सामील होते असा दावाही त्यांनी केला आहे. हवाई दलाचे माजी प्रमुख रणधिर सिंह यांनी मात्र हून यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. रणधिर सिंह यांनी प्रदीर्घ काळ भारतीस सैन्यात काम केले आहे.