धक्कादायक! विषाणूने दूषित पत्रांद्वारे नेत्यांना कोरोनाबाधित करण्याचे कारस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 07:05 AM2020-11-23T07:05:06+5:302020-11-23T07:05:41+5:30
परवडणाऱ्या उपचारखर्चामुळे अनेक जण वाचले असते सरकारी यंत्रणांकडे कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या कमी होती. त्यामुळे खासगी रुग्णालयात आलेल्या रुग्णांकडून उपचारांसाठी भरमसाठ पैसे उकळण्यात आले.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूने दूषित असलेली पत्रे राजकीय नेत्यांना पाठवून त्यांना संसर्गाची लागण करण्याचा काही प्रवृत्तींचा डाव आहे. त्यामुळे सावधानता बाळगण्याचा इशारा इंटरपोलने भारतासह इतर देशांनाही दिला आहे. या संघटनेने म्हटले आहे की, कोरोना साथीच्या काळात काही लोक ठरवून पोलीस अधिकारी, डॉक्टर, आरोग्यसेवकांसमोरच थुंकल्याच्या घटना घडल्या आहेत. थुंकी, कफातून या रोगाचा प्रसार होतो हे माहीत असूनही ही नाठाळ कृती या लोकांनी केली होती. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूने दूषित पत्रे राजकीय नेत्यांना पाठविण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. त्याने कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता खूपच मर्यादित आहे. मात्र, तरीही सर्वांनी सावधगिरी बाळगायला हवी, असेही इंटरपोलने विविध देशांना कळविले आहे.
परवडणाऱ्या उपचारखर्चामुळे अनेक जण वाचले असते सरकारी यंत्रणांकडे कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या कमी होती. त्यामुळे खासगी रुग्णालयात आलेल्या रुग्णांकडून उपचारांसाठी भरमसाठ पैसे उकळण्यात आले. उपचारांचा खर्च खिशाला परवडणारा असता, तर कोरोनाचे अनेक रुग्ण वाचू शकले असते, असे निरीक्षण आरोग्य या विषयावरील संसदीय समितीने एका अहवालात नोंदविले आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूकही केंद्र सरकारने वाढवावी, असेही या समितीने म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामगोपाल यादव हे प्रमुख असलेल्या या समितीने अहवाल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना सादर केला.
केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क
देशाची राजधानी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उद्रेकाचे केंद्र झाल्याने राज्य व केंद्र सरकारमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दिल्लीत घरोघरी जाऊन ५० लाख लोकांची पाहणी करण्याच्या योजनेची युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. शनिवारी पहिल्यांदाच कोरोनाचे निदान करण्यासाठी अँटिजनऐवजी सर्वाधिक आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय गृहविभागाने स्पष्ट केले आहे. रुग्णसंख्या वाढल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. कोविड खाटांची संख्या व दररोज चाचण्या वाढवण्यावर आता भर आहे. डीआरडीओचे नवे २५० व्हेंटिलेटर्स असलेले रुग्णालयदेखील सज्ज ठेवण्यात आले आहे.