मोदींना बदनाम करण्याचा होता कट
By admin | Published: March 11, 2016 03:15 AM2016-03-11T03:15:40+5:302016-03-11T03:15:40+5:30
इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्यामागे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा यापूर्वीच्या संपुआ सरकारचा कट होता
नवी दिल्ली : इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्यामागे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा यापूर्वीच्या संपुआ सरकारचा कट होता, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत गुरुवारी केला आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल,असेही स्पष्ट केले.
इशरत ही लष्कर-ए-तोयबा या संघटनेची दहशतवादी होती, असे प्रथम सांगण्यात आले होते. नंतर सरकारने दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करून आपली भूमिका बदलली. ही दोन्ही प्रतिज्ञापत्रे कुठल्या परिस्थितीत सादर करण्यात आली याची गृहमंत्रालय चौकशी करीत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. या प्रकरणातील काही दस्तावेज गहाळ झाले आहेत. परंतु मंत्रालय स्तरावर अंतर्गत शोध मोहीम सुरू असून यासंदर्भात पुरावे गोळा करण्यात येत आहेत असेही ते म्हणाले. लोकसभेत काही सदस्यांनी लक्षवेधीद्वारे इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्रात कथित बदलासंदर्भात लक्षवेधी दाखल केली होती. त्यावरील चर्चेला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, इशरत ही लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी होती हे लपवून ठेवण्याचा प्रयत्न तत्कालीन संपुआ सरकारने केला. आपल्या पहिल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने हे स्वीकारले होते. पण महिनाभरानंतर प्रतिज्ञापत्र बदलण्यात आले. मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याच्या साक्षीमुळेही इशरतचे लष्करशी संबंध होते हे सिद्ध झाले आहे.
दहशतवादाच्या मुद्यावर राजकारण होऊ नये असे आवाहन करतानाच या समस्येकडे कदापि दुर्लक्ष केले जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथसिंग यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)