अनोखा आदर्श! फक्त 1 रुपया आणि नारळ घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 02:34 PM2023-06-12T14:34:32+5:302023-06-12T14:35:18+5:30
नवरदेवाने हुंडा प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे
देशात हुंड्याच्या नावाखाली छळ, मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. तर काही लोक हुंडा न घेता देखील लग्न करत आहेत. अशीच एक घटना कोटा जिल्ह्यातील सुलतानपूर भागातील दरबिजी गावात समोर आली आहे. ज्यामध्ये नवरदेवाने हुंडा प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सुलतानपूर नगर पोलीस स्टेशनचे हवालदार मुकेश मीणा यांनी त्यांच्या लग्नात हा संदेश दिला आहे.
नवरदेवाने फक्त एक रुपया आणि एक नारळ घेऊन नवरीशी लग्नगाठ बांधली. लग्नात हुंडा घेणार नाही, असं त्यांनी आधीच ठरवलं होतं असं मुकेश यांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दरबिजी गावातील रहिवासी रामावतार मीणा यांची मुलगी सुमन हिचा विवाह बुंदी जिल्ह्यातील जेतपूर येथील रहिवासी साबुलाल मीणा यांचा मुलगा मुकेश यांच्याशी होणार होता, मुकेश हे सुलतानपूर पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहेत.
लग्नात वधूच्या वडिलांनी एक लाख रुपये आणि इतर वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या, पण मुकेश आणि त्यांचे वडील साबुलाल यांनी त्या मोठ्या सन्मानाने परत केल्या. सुरुवातीला वधूच्या वडिलांना वाटले की आपली चूक झाली असावी. त्यामुळे हुंड्याच्या वस्तू परत करण्यात आल्या आहेत. मुकेश य़ांनी एक रुपया आणि नारळ घेऊन लग्नाबाबत सासरच्या मंडळींना सांगितले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लग्नाला आलेले नातेवाईक, पाहुणे सगळेच या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. हुंडामुक्त लग्न करून समाजाला संदेश द्यायचा होता, असं मुकेश यांनी सांगितलं. या निर्णयात त्यांच्या आई-वडिलांनी त्याला साथ दिली.
सुमनला एक रुपया आणि 1 नारळ देऊन जीवनसाथी बनवलं. हुंड्यामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त होत असून मुलींच्या हत्या होत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या मुलीला क्षमतेपेक्षा जास्त हुंडा देऊन वडील कर्जबाजारी होत आहेत. काही वेळा मुलीच्या लग्नासाठी वडिलांना जमीनही विकावी लागते. अशा परिस्थितीत लोकांनी जागरुक राहायला हवे. पोलीस ठाण्यातील अनेक तरुण अधिकारी या लग्नासाठी उपस्थित होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.