वृत्तपत्रांच्या वितरणात सतत येणारे अडथळे हा कायद्याने गुन्हा; देशाच्या वरिष्ठ विधिज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 02:02 AM2020-04-04T02:02:27+5:302020-04-04T06:31:18+5:30
वितरणात अडथळे आणले गेल्यामुळे सार्वजनिक आरोग्याबद्दल अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना लोकांना विश्वासार्ह माहिती मिळण्यात अडचणी येतात.
नवी दिल्ली : वृत्तपत्रांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले गेले असतानाही त्यांच्या वितरणात सतत येत असलेल्या अडथळ्यांबद्दल देशाच्या ज्येष्ठ विधिज्ञांनी काळजी व्यक्त केली आहे.
वितरणात अडथळे आणले गेल्यामुळे सार्वजनिक आरोग्याबद्दल अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना लोकांना विश्वासार्ह माहिती मिळण्यात अडचणी येतात, एवढेच नव्हे तर अत्यावश्यक सेवा कायम राखण्याच्या कायद्याचेही ते उल्लंघन ठरते, असे त्यांचे म्हणणे आहे. या कठीण दिवसांत जबाबदार पत्रकारांच्या लोकांमध्ये घबराट निर्माण न करता बातम्या व लेख अस्तित्वासाठी आवश्यक आहेत, असे हरीश साळवे म्हणाले.
आजच्या युद्धजन्य परिस्थितीत आम्ही अदृश्य अशा शत्रूशी लढत असून, त्याच्याबद्दल आम्हाला फारच थोडी माहिती आहे. या परिस्थितीत माहिती व शत्रूविषयीची माहिती हेच आमच्यासाठी एकमेव शस्त्र आहे, असे साळवे म्हणाले.
अत्यावश्यक सेवेचे कवच ज्याला लाभते (येथे वृत्तपत्रे) त्या सेवेच्या वितरणात लॉकडाऊनच्या दिवसांत जर कोणी अडथळे आणले, तर त्याला वॉरंटशिवाय अटक होईल व एक वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षाही.
समाजमाध्यमांच्या या दिवसांत नुसत्या चर्चा व प्रचारालाही अंतिम सत्याचा दर्जा मिळाला आहे. जबाबदार वृत्तपत्राने छापलेला शब्द ही विशेषत: आजच्या युद्धसदृश दिवसांत अत्यंत आवश्यक सेवा आहे. - हरीश साळवे (ज्येष्ठ विधिज्ञ)
वृत्तपत्राची प्रत लोकांना मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. चहाच्या गरम कपासोबत वृत्तपत्र चाळण्याचा आनंद काही वेगळाच.
- अभिषेक मनू सिंघवी (ज्येष्ठ विधिज्ञ)
वृत्तपत्रांच्या वितरणावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यांचा समावेशच अत्यावश्यक सेवेत केला गेलेला आहे. त्यामुळे कोणीही त्याच्या वितरणात अडथळे आणू शकत नाही.
- तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)