एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 05:58 AM2024-06-07T05:58:05+5:302024-06-07T07:02:41+5:30
तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासह आयटी, दूरसंचार, ग्रामविकास आणि जलशक्ती आदी मलईदार मंत्रालयांची मागणी केली आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : केंद्रात सत्तास्थापनेच्या तयारीत असलेल्या एनडीएतील घटक पक्षांना दिली जाणारे मंत्रिपदे व त्यांच्या पसंतीचे मंत्रालयाबाबत गुरुवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यात याबाबत प्रदीर्घ बैठक झाली. बैठकीला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आणि विनोद तावडे यांनाहीबोलावण्यात आले होते.
तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासह आयटी, दूरसंचार, ग्रामविकास आणि जलशक्ती आदी मलईदार मंत्रालयांची मागणी केली आहे. याशिवाय आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचीही त्यांची मागणी आहे. चंद्राबाबूंना लोकसभा अध्यक्षपदासह किमान तीन मंत्रिपदे हवी आहेत. जदयुचे नेते नितीश कुमार यांनी रेल्वे, कृषी आणि अर्थराज्यमंत्री अशी तीन मंत्रिपदे मागितली आहेत. शिंदेसेनेनेही एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे.
मोदींची होणार संसदीय पक्षनेतेपदी निवड
भाजप संसदीय पक्ष आणि रालोआ (एनडीए) संसदीय पक्षाच्या शुक्रवारी (दि. ७) होणाऱ्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर मोदी राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. भाजपने आपले सर्व खासदार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्या दिल्लीला बोलावले आहे.
संसद भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता रालोआ संसदीय पक्षाची बैठक होईल. या बैठकीत भाजपशिवाय तेलुगू देसम पार्टी, जदयु, लोक जनशक्ती पार्टी, शिवसेना, रालोद, अपना दलसह रालोआचे सर्व खासदार भाग घेतील.
नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या जवळपास १० अपक्ष खासदारांनाही या बैठकीला निमंत्रित करण्यात आल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. रालोआ संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी रालोआ आणि भाजप नेत्यांसह राष्ट्रपती भवनात जातील आणि राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा सादर करतील.
९ जूनला शपथविधी सोहळा?
नरेंद्र मोदी ९ जूनला सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी ८ जूनला शपथविधी सोहळा होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ज्योतिषांनी ९ जूनचा मुहूर्त चांगला असल्याचे सांगितल्याने आता ९ जूनला हा सोहळा होण्याची शक्यता आहे.
शिंदेसेनेला कोणती खाती?
शिंदेसेनेला अवजड उद्योग, जहाजबांधणी, बंदरे व आरोग्य यासारखी मंत्रालये मिळू शकतात. लोक जनशक्ती पार्टीला अन्न प्रक्रिया, अन्नधान्य पुरवठा हे खाते दिले जाण्याची शक्यता आहे. परंतु महत्त्वाची खाती आपल्याकडेच ठेवण्याची भूमिका भाजपची असल्याचे सूत्रांनी सांगितले.