संसदीय समित्यांच्या बैठकीला सदस्यांची सातत्याने गैरहजेरी, व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 06:15 AM2019-12-06T06:15:57+5:302019-12-06T06:21:18+5:30
समितीतील राज्यसभेच्या एकूण ८० सदस्यांपैकी केवळ १८ जण बैठकीस उपस्थित होते.
नवी दिल्ली : संसदीय समितीच्या बैठकीत सदस्यांच्या गैरहजेरीबाबत नाराजी व्यक्त करताना राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी नाराजी व्यक्त केली.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच नायडू यांनी सांगितले की, या समित्यांची अलीकडेच पुनर्स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत झालेल्या ४१ बैठकांची आकडेवारी हे सांगते की, दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची उपस्थिती कमी आहे. आठ स्थायी समितींच्या अध्यक्षांसह १० सदस्य राज्यसभेचे आणि २१ सदस्य लोकसभेचे असतात. यावर्षी डिसेंबरमध्ये या समितींची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर समित्यांच्या ४१ बैठका झाल्या आहेत.
नायडू म्हणाले की, समित्यांच्या बैठकीला सदस्यांच्या गैरहजेरीबाबत काळजी करणारी आकडेवारी समोर आल्यानंतर आज सकाळी मी समित्यांच्या अध्यक्षांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. समितीतील राज्यसभेच्या एकूण ८० सदस्यांपैकी केवळ १८ जण बैठकीस उपस्थित होते. तसेच लोकसभेच्या एकूण १६८ सदस्यांपैकी १८ जण बैठकीस उपस्थित होते. नायडू म्हणाले की, समितीचा प्रत्येक सदस्य २५ संसद सदस्यांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे एका सदस्याच्या गैरहजेरीचा अर्थ २५ सदस्यांचा आवाज ऐकला जात नाही, असा होतो.