‘जंग’विरुद्ध महाभियोगासाठी घटनादुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2015 12:01 AM2015-05-27T00:01:02+5:302015-05-27T00:01:02+5:30
केजरीवाल सरकारने दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याविरुद्ध छेडलेली ‘जंग’ नव्या वळणावर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : केजरीवाल सरकारने दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याविरुद्ध छेडलेली ‘जंग’ नव्या वळणावर पोहोचली आहे. नायब राज्यपालांविरुद्ध महाभियोग चालविण्यासाठी घटनेच्या कलम १५५ मध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव मंगळवारी दिल्ली विधानसभेच्या विशेष सत्रात मांडण्यात आला.
राजभवन व दिल्ली सरकारमधील बदल्या आणि नियुक्तीबाबत केंद्राच्या अधिसूचनेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावताच संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम आदमी पार्टीचे आमदार आदर्श शास्त्री यांनी घटनेच्या कलम १५५ मध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला. सरकार व नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याने घटनात्मक संकट निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत काँग्रेसने अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयावर टीका केली.
दिल्लीवासीयांनी विधानसभा निवडणुकीत आपच्या सरकारला सर्वात मोठा जनादेश दिला असताना केंद्र सरकारने आणलेली अधिसूचना त्यांचा अपमान करणारी आहे, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ठराव सादर करताना म्हटले. ही अधिसूचना घटनेचे उल्लंघन करणारी आहे, असे ते म्हणाले.
जनतेच्या पाठीत सुरा
भोसकला- केजरीवाल
केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात आणलेली अधिसूचना म्हणजे दिल्लीतील जनतेच्या पाठीत सुरा भोसकणे होय. नायब राज्यपालांना मागील दाराने सरकार चालविण्याला मुभा देत भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात आहे, असे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रावर हल्ला चढविला.
काय आहे अधिसूचना
-नायब राज्यपालांना अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे पूर्ण अधिकार. पोलीस किंवा सार्वजनिक व्यवस्थेबाबत आदेश देताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलतीची गरज नाही.
- दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला केंद्र सरकारचे अधिकारी किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करता येणार नाही.
गॅमलीन यांच्या नियुक्तीने वाद
नायब राज्यपाल लेफ्ट. नजीब जंग यांनी गेल्या आठवड्यात ज्येष्ठ सनदी अधिकारी शकुंतला गॅमलीन यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती केल्यानंतर संघर्षाची ठिणगी उडाली. जंग यांनी संपूर्ण प्रशासनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता.
विधानसभेला आग
दिल्ली विधानसभेचे विशेष सत्र सुरू झाल्यानंतर काही तासातच विधानसभा परिसरात मंगळवारी दुपारी आग लागली. अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी बराच वेळानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या कक्षातील एअरकंडिशनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आग लागली त्यावेळी जैन कक्षात उपस्थित नव्हते.
४केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात आणलेली अधिसूचना म्हणजे दिल्लीतील जनतेच्या पाठीत सुरा भोसकणे होय. नायब राज्यपालांना मागील दाराने सरकार चालविण्याला मुभा देत भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात आहे, असे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रावर हल्ला चढविला.
भाजप आमदारास मार्शलद्वारे बाहेर काढले
४विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आपच्या अल्का लांबा यांनी नायब राज्यपालांविरूद्ध केलेल्या वक्तव्यावरून भाजप आमदार ओम शर्मा यांनी जोरदार गोंधळ घातला.
४यावरून विधानसभाध्यक्ष रामनिवास गोयल यांच्यासोबत शर्मा यांची जोरदार खडाजंगी उडाली. यानंतर शर्मा यांना मार्शलला बोलवून सभागृहाबाहेर काढण्यात आले.