कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये फादरनां प्राचार्य बोलण्याची सक्ती
By admin | Published: November 24, 2014 06:53 PM2014-11-24T18:53:34+5:302014-11-24T18:53:34+5:30
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये फादरचा उल्लेख प्रचार्य, गुरुजी किंवा सर असा करण्यात येणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
रायपूर (छत्तीसगड), दि. २४ - छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये फादरचा उल्लेख प्रचार्य, गुरुजी किंवा सर असा करण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेच्य दबावाला बळी पडत येथील कॉन्व्हेंट शाळा चालकांनी हा प्रस्ताव मान्य केला आहे. या संदर्भात दोन्ही संस्थांच्या प्रमुखांची रविवारी (दि. २३) बैठक झाली असून या बैठकीत कॅथलिक शाळा चालकांनी विश्व हिंदू परिषदेच्या अटी मान्य केल्या आहेत.
या प्रस्तावावर विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष सुरेश यादव आणि बस्तर कॅथलिक कम्युनिटीचे प्रवक्ते अब्राहम कन्नामपला यांनी स्वक्ष-या केल्या आहेत. बस्तर हा आदिवासी बहूल विभाग असून या विभागात कॅथलिक समाजातर्फे २२ शाळा चालवल्या जातात. या विभागात केरळहून अधिक मिशनरींचा विकास झाला आहे. दोन्ही संस्थांच्या मान्यतेनुसार सर्व कॉन्व्हेंट शाळांतील सुचनाफलकांवर 'फादर' चा उल्लेख प्रचार्य, उपप्राचार्य किंवा सर असा करण्यात यावा अशी सुचना लिहली आहे. तसेच कॅथलिक पंथाकडून कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असेही लिहण्यात आले आहे. याबाबात अधिक स्पष्टिकरण देताना सुरेश यादव यांनी असे सांगितले की, फादर या शब्दाचा अर्थ पिता असा होतो, हिंदू धर्मात पिता एकच असतो त्यामुळे आम्ही शिक्षकांना पित्याचा दर्जा कसा देणार? यावर युक्तिवाद करत मिशन-यांनी बायबलमध्ये फादरचा अर्थ गॉडफादर असा होतो असे सांगितले असता सुरेश यादव यांनी शाळांमध्ये बायबलचे धडे का देण्यात यावेत तसेच इतर शाळांमध्ये शिक्षकांना फादर बोलण्याचा नियम नसताना हा नियम कॉन्व्हेंट शाळांमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरस्वतीच्या प्रतिमेबद्दल सांगताना त्यांनी असे सांगितले की, कोणत्याही वयस्कर स्त्रीला आम्ही मातेचा दर्जा देतो. तिला आई किंवा ताई असे आदराने म्हणतो. या प्रकरणी कॅथलिक पंथाच्या प्रवक्ते कानमपला यांनी असे सांगितलेकी, आम्ही कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच फादर संबोधण्यासाठी आमचा कुणावरीह दबाव नाही, आम्ही सरस्वती देवीची प्रतिमा आमच्या शाळांमध्ये लावण्यास तयार आहोत असेही त्यांनी सांगितले.