आमच्या भूभागावरच बांधकाम केलंय; अरुणाचल प्रदेशमधील 'त्या' प्रकरणावरून चीनने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 01:28 PM2021-01-22T13:28:37+5:302021-01-22T13:33:45+5:30
अरुणाचल प्रदेशात चीननं गाव उभारल्याचं सॅटलाईट फोटोंमधून आलं होतं समोर
लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत असलेल्या सीमेवर चीनकडून सातत्याने कुरापती काढण्यात येत असतात. या भागात सीमारेषा निश्चित नसल्याने चिनी सैन्याकडून या भागात सातत्याने घुसखोरी होत असते. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधीलभारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी करून चक्क एक गाव वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सॅटेलाइट फोटोंमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा दावा करण्यात आला होता. परंतु आता या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना आपल्याच जमिनीवर बांधकाम केलं असल्याचं सांगत चीननं सुनावलं आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. असं असलं तरी अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असल्याचा दावा सातत्यानं चीनकडून करण्यात येत आहे.
"जंगनान क्षेत्रावरील (दक्षिण तिबेट) चीनची स्थिती स्पष्ट आणि स्थिर आहे. आम्ही कधीही तथाकथित अरुणाचल प्रदेशला मान्यता दिली नाही. आम्ही आमच्या भूभागावर चीनची विकासकामं करणं आणि बांधकाम करणं सामान्य आहे. हे आमचं क्षेत्र आहे त्यामुळे दोष देता येणार नाही," अशी प्रतिक्रिया चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी माध्यमांशी बोलताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
काही दिवसांपूर्वी माहिती आली होती समोर
सॅटेलाइट फोटोत दिसत असलेल्या बांधकामानुसार चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या हद्दीत घुसखोरी करून एक नवा गाव वसवलं असल्याचं दिसत आहे. या गावामध्ये सुमारे १०१ घरं असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच हे सॅटेलाइट फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजीचे असल्याचंही म्हटलं जात आहे. याबाबत तज्ज्ञांना विचारले असता त्यांनी जा छायाचित्रांना दुजोरा दिला. तसेच हे गाव भारताच्या प्रत्यक्ष सीमेपासून साडे चार किलोमीटर आत वसले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बाब भारताची चिंता वाढवणारी आहे.
हे गाव अरुणाचल प्रदेशमधील अप्पर सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. या भागातील सीमेवरून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. तसेच या भागाला सशस्त्र लढाईची जागा म्हणून चिन्हांकित करण्यात आलं आहे. हे गाव हिमालयाच्या पूर्व भागात अशावेळी वसवण्यात आलं आहे. काही काळापूर्वी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक चकमक झाली होती.