अयोध्येत राममंदिराचे बांधकाम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:51 PM2020-05-26T23:51:10+5:302020-05-26T23:51:17+5:30
बांधकामाला सुरवात झाल्यावर महंत दास यांनी सकाळी पूजा केली.
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला मंगळवारपासून प्रारंभ झाला, अशी घोषणा राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी केली. तत्पूर्वी, त्यांनी तात्पुरत्या मंदिरातील राम लल्लांच्या मूर्तीला नमस्कार केला. बांधकामाला सुरवात झाल्यावर महंत दास यांनी सकाळी पूजा केली.
दास हे राम जन्मभूमी न्यासचेही प्रमुख आहेत. २७ वर्षांनंतर २५ मार्च, २०२० रोजी भगवान राम लल्ला अयोध्येतील तात्पुरत्या मंदिरातून हलवण्यात आले आणि मूर्ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पालखीतून मानस भवनमध्ये नेण्यात आली. तात्पुरते मंदिर फायबरचे आणि बुलेटप्रूफ आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर, २०१९ रोजी दिलेल्या निवाड्यामुळे अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिराच्या बांधकामाचा ट्रस्टचा मार्ग खुला झाला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने म्हटले होते की,‘‘जमीनदोस्त झालेल्या रचनेच्या ठिकाणी भगवान राम जन्मले होते ही हिंदूंची श्रद्धा निर्विवाद आहे.’’
खंडपीठात न्यायमुर्ती एस. ए. बोबडे, अशोक भूषण, डी. वाय. चंद्रचूड आणि एस. अब्दुल नाझीर यांचा समावेश होता. या खंडपीठाने मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डला पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असे केंद्र सरकारला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हा ५ विरुद्ध शून्य असा एकमताचा होता. वादग्रस्त २.७७ एकर जमिनीचा ताबा हक्क राम लल्ला देवतेला हस्तांतरीत केले जावे, असेही न्यायालयाने म्हटले.