राम मंदिराच्या बांधणीचा मुहुर्त ठरला? या तिथीपासून होऊ शकते बांधकामास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 10:44 AM2019-11-11T10:44:08+5:302019-11-11T10:45:03+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळे अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमीवर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळे अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमीवर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाची कायदेशीर परवानगी मिळाल्य़ानंतर आता प्रत्यक्ष राम मंदिराच्या बांधणीची सुरुवात कधी होणार याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पुढील वर्षी रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर राम मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त रामजन्मभूमी ही प्रभू श्रीरामाची आहे, असा निकाल दिला होता. तसेच मंदिराच्या बांधणीसाठी केंद्र सरकारने तीन महिन्यांच्या आत एक ट्रस्ट स्थापन करावी, असे आदेश दिले होते. 1989 मध्ये राम मंदिराचे भूमीपूजन झालेले असल्याने राम मंदिराचे बांधकाम सुरू करताना पुन्हा एकदा शीलापूजन करायचे की नाही याबाबत स्पष्टता होऊ शकलेली नाही.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी 5 एकर जमीन देण्यासाठी तीन ते चार भूखंड पाहून ठेवण्याचे आदेश अयोध्येच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी जमीन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त 2.77 एकर जमीन प्रस्तावित ट्रस्टला देण्याचे आणि पाच एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे काम एकाच वेळी होईल. पाच एकर जमीन घ्यायची का आणि घेतलीच तर ती कुठे घ्यायची याबाबतचा निर्णय सुन्नी वक्फ बोर्ड याच महिन्यात घेणात आहे. दरम्यान, राम मंदिर ट्रस्टची निर्मिती ही सोमनाथ ट्रस्ट, अमरनाथ श्राइन बोर्ड, माता वैष्णौदेवी श्राइन बोर्ड यांच्या धर्तीवर होण्याची शक्यता आहे.