अयोध्येत राममंदिराची उभारणी डिसेंबरपासून
By Admin | Published: January 8, 2016 03:19 AM2016-01-08T03:19:30+5:302016-01-08T03:19:30+5:30
अयोध्येतल्या राम मंदिराचे बांधकाम उशिरात उशिरा २0१६ च्या अखेरच्या महिन्यात सुरू होईल. मंदिर उभारणीसाठी कोणतेही आंदोलन केले जाणार नाही
नवी दिल्ली : अयोध्येतल्या राम मंदिराचे बांधकाम उशिरात उशिरा २0१६ च्या अखेरच्या महिन्यात सुरू होईल. मंदिर उभारणीसाठी कोणतेही आंदोलन केले जाणार नाही तर सर्वसहमतीनेच या मंदिराची निर्मिती केली जाईल. सुप्रीम कोर्टात सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणाचा निकाल बहुधा आॅगस्ट अथवा सप्टेंबर महिन्यात लागेल. निकालाची आम्ही प्रतीक्षा करू, त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या सहमतीनेच वर्षअखेर मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ होईल, असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीतील विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना काढले.
हिंदू व मुस्लिम समुदाय या विषयावर सहमत होतील याची खात्री आपणास कशामुळे वाटते? असे विचारता स्वामी म्हणाले, या विषयावर सौहार्दपूर्ण वातावरणात दोन्ही समुदायांमधे चर्चा व्हावी व त्यातून सहमतीचा तोडगा निघावा यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली विद्यापीठात त्यासाठी दोन दिवसांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ३00 विद्वान, पुरातत्व विभागाचे जाणकार, इतिहासतज्ज्ञ व शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यात निमंत्रित करण्यात आले आहे.
९ जानेवारीला मंदिर निर्माणाचा अॅक्शन प्लॅन जाहीर केला जाईल, असा गौप्यस्फोटही याप्रसंगी स्वामींनी केला.
उत्तरप्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम आखण्यात आली आहे काय? या थेट प्रश्नाचे उत्तर देतांना स्वामी म्हणाले, प्रभू श्रीरामाचे अयोध्येतील मंदिर हा हिंदूसाठी आस्था, प्रेरणा आणि विश्वासाचा विषय आहे. देशातला प्रत्येक हिंदू त्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचा संबंध कोणत्याही निवडणुकीशी जोडणे योग्य नाही.
लखनौत एका कार्यक्रमात भाजप खासदार साक्षी महाराज म्हणाले, जगातील कोणतीही शक्ती अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण रोखू शकणार नाही. सारांश राममंदिराच्या जुन्या विषयाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून उत्तरप्रदेशची निवडणूक जसजशी जवळ येईल, या विषयाच्या संघर्षाची धारही वाढत जाण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)