काेराेनाचा फटका; सण-उत्सवकाळातील खरेदीकडे ग्राहकांची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:54+5:302020-12-15T06:53:00+5:30
३३ टक्के कुटुंबांकडून कोणतीही खरेदी नाही
मुंबई : कोरोना संकटाच्या सावटाखाली देशात दसरा, दिवाळी आणि नवरात्रौत्सव साजरे झाले. दरवर्षी या उत्सवकाळात घराघरांत खरेदीची लगबग असते. परंतु, यंदा देशातील जवळपास ३३ टक्के कुटुंबांनी या कालावधीत कोणतीही खरेदी केली नसल्याची माहिती लोकल सर्कल या राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेच्या सर्वेक्षणातून हाती आली आहे.
३७ टक्के लोकांनी एक ते दहा हजार रुपये, २० टक्के लोकांनी १० ते ५० हजार रुपये खर्च केले. तर, ५० हजारांपेक्षा जास्त खर्च करणाऱ्यांची संख्या ९ टक्के आहे. ग्राहकांची मानसिकता समजून घेण्यासाठी लोकल सर्कलने हे सर्वेक्षण केले होते. देशातील ३०२ जिल्ह्यांतल्या सुमारे ४४ हजार जणांनी त्यावर आपली मते नोंदवली आहेत. त्यात ६२ टक्के पुरुष आणि ३८ टक्के महिलांचा समावेश आहे. ५५ टक्के लोक हे मोठ्या शहरांतील असल्याचे लोकल सर्कलने स्पष्ट केले आहे. पुढच्या चार महिन्यांतही अवास्तव खर्च करणार नसल्याचे ४४ टक्के लोकांनी सांगितले आहे.
काेराेना काळात अनेकांना नाेकरी गमवावी लागली. काही जणांचे पगार कमी झाले. हे संकट आणखी किती काळ आपल्या साेबत असेल, हे समजू न शकल्याने अनेकांनी काटकसरीचे धाेरण अवलंबले. या कालावधीत घरांची दुरूस्ती आणि रंगरंगोटीवरील खर्चाला प्राधान्य असेल असे ३५ टक्के लोकांनी सांगितले आहे. त्याखालोखाल घरात आवश्यक असलेली उपकरणे, स्मार्ट फोन, खरेदी करण्याची अनेकांची मनीषा आहे.
मालमत्ता, वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न असेल, असे सांगणाऱ्यांचे प्रमाण अनुक्रमे २ आणि सात टक्के आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत मासिक उत्पन्न घटल्याची कबुली सर्वेक्षणात दिली आहे.
’ बचतही घटली
कोरोना संकटामुळे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली असून २८ टक्के कुटुंबांनी
आपली बचत ५० टक्क्यांनी घटल्याची कबुली दिली आहे.
ही घट २५ ते ५० टक्के असल्याचे १५ टक्के लाकांचे म्हणणे असून ० ते २५ टक्के घट झालेल्या लोकांचे प्रमाण २५ टक्के आहे.
तर, बचतीवर कोणताही परिणाम झाला नाही हे सांगणाऱ्यांचे प्रमाण २१ टक्के आहे. उर्वरित १० टक्के लोकांनी बचत वाढल्याचे उत्तर दिले आहे.