कमी नोकऱ्या, अल्प वेतनामुळे ग्राहकांचा विश्वास ढासळला!; रिझर्व्ह बँकेच्या ‘कॉन्फिडन्स’ अहवालातील तथ्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 06:24 AM2018-10-09T06:24:51+5:302018-10-09T06:36:54+5:30
देशातील आर्थिक स्थिती सातत्याने बिघडत आहे, पण पुढील वर्षभरात ही स्थिती सुधारेल, अशी आशा ग्राहकांनी रिझर्व्ह बँकेच्या ‘कॉन्फिडन्स’ अहवालात व्यक्त केली आहे.
मुंबई : कमी नोकऱ्या, अल्प वेतनामुळे ग्राहकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास काहीसा ढासळला आहे. सध्याची स्थिती निराशाजनक आहे, असे मत ग्राहकांनी व्यक्त केले आहे. देशातील आर्थिक स्थिती सातत्याने बिघडत आहे, पण पुढील वर्षभरात ही स्थिती सुधारेल, अशी आशा ग्राहकांनी रिझर्व्ह बँकेच्या ‘कॉन्फिडन्स’ अहवालात व्यक्त केली आहे.
रिझर्व्ह बँकेने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा ‘कन्झ्युमर कॉन्फिडन्स’ अहवाल जाहीर केला आहे. एप्रिल ते जूनदरम्यान याच अहवालात ग्राहकांनी आर्थिक स्थितीबाबत निराशा व्यक्त केली होती, पण जुलै ते सप्टेंबर या कालावधित त्याहीपेक्षा स्थिती बिघडल्याचे या अहवालात
समोर आले आहे. वाढत्या महागाईमुळे आर्थिक स्थितीबाबत नागरिकांमधील आत्मविश्वास कमालीचा घसरला आहे.
आर्थिक स्थितीचा निर्देशांक जूनअखेरीस उणे ५.४ वर होता. तो आता उणे १०.४ वर आला आहे. जूनअखेरीस उणे ४.१ वर असलेला रोजगार निर्देशांक आता उणे १०.३ वर आला आहे. वस्तुंच्या किमतीचा निर्देशांकसुद्धा नकारात्मक श्रेणीत आहे. यामुळे ग्राहकांच्या क्रयशक्तीचा ºहास होत आहे. एकूण निर्देशांकाचा विचार केल्यास, त्यात मागील तिमाहीपेक्षा या तिमाहीत ४.५ अंकांची घट झाली आहे.
पुढील वर्षभरात ही स्थिती सुधारेल, असा आशावाद ग्राहकांनी व्यक्त केला आहे. पण त्यातही जूनपेक्षा यंदा घट झाली आहे. वर्षभरात रोजगाराची स्थिती सुधरण्यासंबंधीचा निर्देशांक जूनअखेरीस २७.५ वर होता. सप्टेंबरअखेरीस हा निर्देशांक २५.१ वर आला. वर्षभरात ग्राहकांची क्रयशक्ती वाढण्यासंबंधीचा निर्देशांक जूनअखेरीस ८४.४ वर होता. तो आता ७८.१ वर आला आहे.
डिसेंबर २०१३मध्येही होती अशीच स्थिती
लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी डिसेंबर २०१३मध्येही ग्राहकांचा ‘कॉन्फिडन्स’ असाच होता. त्याचा प्रत्यय मतपेट्यांतून दिसला आणि केंद्रात सत्ताबदल झाला. आता तशीच परिस्थिती असल्याने पुढे राजकीय फेरबदल झाल्यास नवल वाटू नये, असे अर्थतज्ञांचे मत आहे.
ग्राहकांमधील आत्मविश्वास
जून सप्टेंबर
२०१८ २०१८
रोजगार -४.१ -१०.३
वस्तुेंच्या किमती -८६.० -८५.१
मिळकत ५.० ४.९
खर्च ८१.८ ७४.९
एकूण ९८.३ ९४.८