उत्तर भारतीयांचा अवमान; गंगवार यांच्याविरुद्ध याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 03:40 AM2019-09-18T03:40:45+5:302019-09-18T03:40:53+5:30
उत्तर भारतीयांचा अवमान केल्याबद्दल केंद्रीय कामगार व रोजगार खात्याचे राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्याविरोधात बिहारच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुझफ्फरपूर : उत्तर भारतीयांचा अवमान केल्याबद्दल केंद्रीय कामगार व रोजगार खात्याचे राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्याविरोधात बिहारच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतामध्ये कार्यकुशल लोक उपलब्ध नसल्याची तक्रार उद्योजक करतात, असे विधान गंगवार यांनी केले होते.
सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांच्या न्यायालयात सोमवारी ही याचिका दाखल केली. गंगवार यांनी आपल्या वक्तव्याने उत्तर भारतीयांचा घोर अवमान केला आहे असा आरोप करण्यात आला आहे. भादंविच्या १५३, १९५, २९५ व ४०५ या कलमांखाली ही याचिका दाखल करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
>सारवासारव
आजच्या युवकांमध्ये कौशल्याची कमतरता आहे एवढाच मुद्दा आपल्याला मांडायचा होता असे स्पष्टीकरण गंगवार यांनी दिले. युवकांमध्ये विविध कौशल्यांची वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारने कौशल्यविकास मंत्रालयाची स्थापना केली असल्याचेही ते म्हणाले. उत्तर भारतीयांचा अवमान केल्याचा आरोप करत काँग्रेसपासून अन्य काही विरोधी पक्ष गंगवार यांच्यावर तुटून पडले.