कामगार कायद्यांचे खच्चीकरण सुरू
By admin | Published: December 6, 2015 03:27 AM2015-12-06T03:27:33+5:302015-12-06T03:27:33+5:30
केंद्रातील मोदी सरकारकडून हेतुपुरस्सर कामगार कायदे कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे, असा आरोप काँग्रेसचे
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारकडून हेतुपुरस्सर कामगार कायदे कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.
मोदी यांनी कामगारांवर मोठा हल्ला सुरू केला असल्याचा दावा करतानाच काँग्रेसने भूसंपादन विधेयकावर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाजूने संघर्ष केला तसाच लढा कामगारांसाठीसुद्धा देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
काँग्रेसशी संलग्न कामगार संघटना इंटकच्या ३१ व्या पूर्ण सत्राला राहुल गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. काँग्रेस पक्ष नेहमीच कामगारांसोबत उभा राहील, असे सांगून काँग्रेस उपाध्यक्ष म्हणाले, चीनच्या तुलनेत भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याच्या पंतप्रधानांच्या विचारांशी मी सहमत आहे; परंतु ही सहमती येथेच संपते.
भारतीय कामगार बेईमान आणि कामचुकार आहेत आणि हंटर हाती घेऊनच त्यांच्याकडून काम करवून घ्यावे लागत असल्याचे पंतप्रधानांचे मत आहे. त्यामुळेच कामगार कायदे कमकुवत करून त्यांना आपल्यापुढे गुडघे टेकायला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही त्यांनी केला. यासंदर्भात गांधी यांनी गुजरात, राजस्थान आणि हरियाणात तयार करण्यात येत असलेल्या नव्या कायद्यांचा उल्लेख केला.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि इंटकचे प्रमुख जी. संजीव रेड्डी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)