जो काळा कोट घालून येईल, त्यालाच कंत्राट! ‘फिक्की’च्या परिषदेत गडकरींची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 08:41 AM2023-05-18T08:41:19+5:302023-05-18T08:41:45+5:30
जो पायजमा शिवू शकतो, तो फुलपँटही शिवू शकतो; पण रेल्वेसाठी बोगदे करणारे रस्त्यांसाठी अपात्र ठरतात. जे रस्त्यांसाठी बोगदे बनवतात ते रेल्वेसाठी अपात्र ठरतात. ते दोघेही जलविद्युत प्रकल्पांसाठी अपात्र ठरतात. हा भेदभाव संपविण्यासाठी समान धोरण ठरवायला हवे.
सुनील चावके -
नवी दिल्ली : पायजमा, फुलपँट आणि काळ्या कोटाचे दाखले देत केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ‘फिक्की’च्या कार्यक्रमात देशभरात सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांची कंत्राटे निश्चित करताना तांत्रिक आणि वित्तीय पात्रतेच्या निकषांमध्ये केल्या जाणाऱ्या चलाखीवर मार्मिक भाष्य केले.
जो पायजमा शिवू शकतो, तो फुलपँटही शिवू शकतो; पण रेल्वेसाठी बोगदे करणारे रस्त्यांसाठी अपात्र ठरतात. जे रस्त्यांसाठी बोगदे बनवतात ते रेल्वेसाठी अपात्र ठरतात. ते दोघेही जलविद्युत प्रकल्पांसाठी अपात्र ठरतात. हा भेदभाव संपविण्यासाठी समान धोरण ठरवायला हवे. पायाभूत प्रकल्पांचे खर्च वाढविण्यासाठी तांत्रिक आणि वित्तीय पात्रतेचे निकष ठरविताना भरपूर चलाखी केली जाते. कोण पात्र आणि कोण अपात्र, हे आधीच ठरते. महाराष्ट्रात तर एकवेळ अशी होती की जो काळा कोट घालून येईल त्यालाच कंत्राट मिळेल, एवढेच पात्रतेचे निकष ठरवताना लिहायचे शिल्लक राहिले होते. हे निकष उदार असण्याची गरज आहे, असे बोगद्यांच्या बांधकामावर फिक्कीने आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना गडकरी म्हणाले. देशभरात बोगदे आणि भुयारी मार्गांची कामे खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
नवे तंत्रज्ञान, नव्या प्रयोगांना परवानगी द्यावी
नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सरकारी पातळीवर अनिच्छा दाखवली जाते. पायाभूत सुविधांची निर्मिती करताना आपल्या जोखिमीवर नवे प्रयोग करण्यासाठी नवे तंत्रज्ञान आणू पाहणाऱ्या कंत्राटदाराला परवानगी दिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका गडकरी यांनी घेतली.