विरोधाला सकारात्मकता, अभ्यासाची जोड द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 06:39 AM2020-02-21T06:39:11+5:302020-02-21T06:39:30+5:30
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू; भारतीय छात्र संसद परिषदेचे उद्घाटन
उमेश जाधव
नवी दिल्ली : सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सकारात्मकता व अभ्यासाची जोड गरजेची आहे. विरोध करताना तरुणांनी हिंसेकडे वळू नये आणि सर्व मुख्य समस्यांचा विचार, अभ्यास करून जबाबदारी स्वीकारून राजकीय क्षेत्रात उतरावे, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. दहाव्या भारतीय छात्र संसद परिषदेचे उद्घाटन करताना उपराष्ट्रपतींनी तरुणांना मार्गदर्शन केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट, पुणे आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशन यांच्यातर्फे झालेल्या परिषदेत लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदचे समन्वयक राहुल कराड यावेळी उपस्थित होते.
तरुणाला शिक्षित, प्रेरित करण्याची गरज आहे. छात्र संसदेचा तरुणांच्या जीवनाला दिशा देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मात्र, त्यासाठी तरुणांनी समाजातील बदल, आर्थिक, विकास या मुद्द्यांचा स्वत:हून अभ्यास करावा. सत्ताधारी योजना मांडतात, विरोधक विरोध करतात आणि सभागृह बंद पाडतात हे पाहणे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगून मातृभाषेतच बोला असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
दरडोई उत्पन्न वाढविण्यावर असावा भर
एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड यांनी शाल व स्मृतीचिन्ह देऊन विजय दर्डा यांचा सत्कार केला. दर्डा म्हणाले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी अर्थव्यवस्था सावरून जीडीपी आठच्याही वर नेला. मोदीही तोच प्रयत्न करीत आहेत. त्याला विदेशी गुंतवणुक, रोजगार निर्मिती याची जोड आवश्यक आहे. पंतप्रधानांनी स्वप्न बघितले आहे व स्वप्न बघितल्याशिवाय, उद्दिष्ट ठेवल्याशिवाय काही निर्माण करता येत नाही.
या कार्यक्रमात लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे, त्याचप्रमाणे देशाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यावरही त्यांनी भर द्यायला हवा. छात्र संसदेत ‘५ ट्रिलियन अर्थव्यवस्था : आव्हाने आणि युवकांसाठी संधी’ या विषयावर त्यांनी विचार मांडले.
पण अर्थव्यवस्थेचा आकार वाढवून देश समृद्ध होईल का, आनंदी होईल का? या आकाराने विकासाचे द्वार खुले होईल का? याचाही विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आकाराने मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका, जापान, चीन आदी देशांचेही उदाहरण दिले. भारतीय छात्र संसदेचे संस्थापक राहुल कराड यांच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
परिवर्तनासाठी लढणारा प्रत्येकजण ‘हिरो’ -सत्यार्थी
समाजातील वेदना समजून घेऊन परिवर्तनासाठी लढणारा प्रत्येक व्यक्ती ‘हिरो’ आहे. मात्र, हे परिवर्तन सहज शक्य नसून त्यासाठी संघर्षाला पर्याय नसल्याचे प्रतिपादन नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले. देशात लहान मुले, मुली सुरक्षित राहू शकत नसतील तर तुम्हाला संताप यायला हवा, असेही ते म्हणाले.
परिश्रमाला पर्याय नाही - डॉ. माशेलकर
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रमांना पर्यायच नाही. शिक्षण हे भविष्य आहे. मात्र, शिक्षणात सातत्य असल्याशिवाय प्रगती शक्य नाही, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले
ग्रामीण भागात कामाची गरज - डॉ. भटकर
महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असे म्हटले होते. मात्र, आजही ग्रामीण भागात अनेक प्रश्न कायम आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. विज्ञानालाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आलेले नाहीत, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर म्हणाले.