कारगिलमध्ये तैनात जवानांच्या निवासस्थानासाठी 71 लाखांचे योगदान, लोकमत फाउंडेशनकडून संरक्षणमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 06:52 AM2022-06-29T06:52:31+5:302022-06-29T06:53:58+5:30

दिल्लीतील साऊथ ब्लाॅकमध्ये संरक्षण मंत्रालयात मंगळवारी कारगिलमध्ये शहीद व जखमी जवानांसाठी लोकमतने दिलेल्या योगदानाची माहिती विजय दर्डा यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिली. लोकमत समूहाने १९९९ पासून आतापर्यंत  कारगिल सहाय्यता निधीत २.५८ कोटी रुपये जमा केले.

Contribution of Rs 71 lakh for accommodation of personnel deployed in Kargil Checks handed over to Defense Minister by Lokmat Foundation | कारगिलमध्ये तैनात जवानांच्या निवासस्थानासाठी 71 लाखांचे योगदान, लोकमत फाउंडेशनकडून संरक्षणमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द

कारगिलमध्ये तैनात जवानांच्या निवासस्थानासाठी 71 लाखांचे योगदान, लोकमत फाउंडेशनकडून संरक्षणमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द

Next

नवी दिल्ली : कारगिलस्थित युद्ध स्मारकाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या निवासस्थानासाठी लोकमत फाउंडेशनतर्फे ७१ लाख रुपयांच्या निधीचा धनादेश मंगळवारी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी संसद सदस्य विजय दर्डा यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी लेफ्टनंट जनरल पी. एस. शेखावत हेही उपस्थित होते. 

१९९९ मधील कारगिल युद्धातील विजयाचे स्मारक श्रीनगर ते लेह या एनएच-१ डी या राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आले आहे. हे ठिकाण पाकिस्तान सीमेपासून खूप जवळ असल्याने अतिरेकी हल्ल्याचा धोका असतो. म्हणून सुरक्षेसाठी जवानांची एक तुकडी तैनात आहे. अतिउंचीवर तैनाती आणि उणे ४२ डिग्री सेल्सिअस इतकी भयंकर थंडी अशा परिस्थितीत तेथे तैनात जवानांसाठी पक्की घरे आवश्यक होती. त्यासाठी जवळपास ७१ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित होता. सैन्याची ही गरज  लोकमत कारगिल शहीद सहाय्यता निधीमधून पूर्ण करण्यात येत आहे. या निवासस्थानांचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू असून येत्या २६ जुलै रोजी, कारगिल विजयदिनी त्यांचे लोकार्पण होऊ घातले आहे. त्यासाठी विजय दर्डा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

दिल्लीतील साऊथ ब्लाॅकमध्ये संरक्षण मंत्रालयात मंगळवारी कारगिलमध्ये शहीद व जखमी जवानांसाठी लोकमतने दिलेल्या योगदानाची माहिती विजय दर्डा यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिली. लोकमत समूहाने १९९९ पासून आतापर्यंत  कारगिल सहाय्यता निधीत २.५८ कोटी रुपये जमा केले. त्यातून ४१ शहिदांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १.०८ लाख रुपये, तसेच ३९ जखमी जवानांना आर्थिक मदत देण्यात आली. यासाठी एकूण ४८ लाख २८ हजार रुपये खर्च झाले. याशिवाय, शहिदांच्या मुलांसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी वसतिगृहे उभारण्यात आली. त्यासाठी नागपुरात ३८.०५ लाख, औरंगाबादमध्ये ४५.९१, तर लातूरमध्ये २९.९५ आणि सोलापुरात २४.५ लाख रुपये खर्च करण्यात आले. असे खर्च झालेले एकूण १ कोटी ३८ लाख ४१ रुपये वगळता शिल्लक राहिलेल्या ७१ लाख रूपयांचा धनादेश मंगळवार विजय दर्डा यांनी सेना कल्याण विभागाच्या कारगिल युद्ध स्मारक कोषासाठी संरक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द केला. अशा रितीने लोकमतच्या कारगिल शहीद सहाय्यता निधीत जमा झालेली संपूर्ण २ कोटी ५८ लाखांची रक्कम खर्च करण्यात आली आहे. 

दिल्लीतील साऊथ ब्लॉक स्थित संरक्षण मंत्रालयात विजय दर्डा यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे व्हाईस प्रेसिडेंट आशिष भाटिया, नॅशनल एडिटर हरीश गुप्ता, सिनियर एडिटर (बिझनेस ॲण्ड पॉलिटिक्स) शरद गुप्ता आणि दर्डा यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण भागवत यांचीही उपस्थिती होती.

संपूर्ण पारदर्शक व्यवहार -
हा निधीचा व्यवहार पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यात आला. रक्कम बँक ऑफ इंडियाच्या सीताबर्डी (नागपूर) शाखेत एका स्वतंत्र खात्यात जमा करण्यात आली होती. ती अन्य कोणत्याही कामासाठी वापरण्यात आली नाही. जवानांचे वारस व इतरांना अकाउंट पेयी चेकद्वारे रकमा देण्यात आल्या. सर्व वसतिगृहांचे बांधकाम संरक्षण खात्याच्या मालकीच्या जमिनीवर करण्यात आले आणि जखमी अथवा शहीद सैनिकांच्या पाल्यांना प्राधान्याने प्रवेश देण्याच्या अटीवरच ती सैनिक कल्याण विभागाकडे सोपविण्यात आली. विश्वास व प्रेमाचे प्रतीक लोकमत समूहाने पुढाकार घेऊन उभारलेला हा निधी वाचकांच्या लोकमतवरील विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक ठरले.

लोकमतने स्वत:चे योगदान देतानाच सामान्य नागरिकांना मदतीचे आवाहन केले आणि दात्यांची नावे दररोज वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आली. या निमित्ताने लोकमत वृत्तपत्र समूहाने रक्तांजली ही स्मरणिकाही प्रकाशित केली. तिचे प्रकाशन कारगिल विजय दिनी, २६ जुलै २००१ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये झाले होते. यावेळी तत्कालीन संरक्षणमंत्री जसवंत सिंह, तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, तत्कालीन वित्तमंत्री यशवंत सिन्हा आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. नागपूर येथील सैनिकी वसतिगृहाचा शिलान्यास २१ जून २००० रोजी तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते झाला. 

यापूर्वी नागपूर, औरंगाबाद, लातूर आणि सोलापूरमध्ये उभारली आहेत शहीद जवानांच्या मुलांसाठी वसतिगृहे

जवानांच्या घरोघरी जाऊन मदतीचे वाटप -
लोकमत कारगिल सहाय्यता निधीचे वाटप योग्य रीतीने व्हावे यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावागावांमध्ये जाऊन लोकमत समूहाने कारगिल युद्धातील हुतात्मे तसेच जखमी जवानांना मदतीचे वाटप केले. कुटुंबातील इतरांना मदतीची रक्कम खर्च करता येऊ नये यासाठी हुतात्म्यांची वीरपत्नी तसेच वारस मुलांच्या नावाने बँक खाती उघडली व एफडी प्रमाणपत्रे सुपूर्द केली. अशा ४१ हुतात्म्यांच्या ६५ वारसांना अर्थसहाय्य करण्यात आले. त्यात औरंगाबादचे २१, सांगलीचे १०, सोलापूरचे ७, तर नागपूरचे ३ हुतात्म्यांचा समावेश आहे. 

२ कोटी ५८ लाख रुपयांचे योगदान -
लोकमत कारगिल सहाय्यता निधीमध्ये  जमा झालेल्या एकूण रकमेतील ४८ कोटी २८ लाख रूपये शहीद जवानांचे वारस आणि जखमी जवानांना मदतीसाठी खर्च करण्यात आले, तर १ कोटी ३८ लाख ४१ हजार रूपये वसतिगृहांच्या उभारणीवर खर्च करण्यात आले. उरलेले ७१ लाख रूपये मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. अशा रीतीने देणगी व तिच्यावरील व्याज मिळून २ कोटी ५८ लाखांचा व्यवहार पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आला. 

मनुष्यबळ, वृत्तपत्राची जागा सार्थकी -
कारगिल युद्धावेळी आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्मे तसेच जखमी झालेल्या जवानांच्या मदतीसाठी लोकमत परिवाराने जिवाचे रान केले. निधीसंकलनासाठी लोकमतच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला, कित्येक हजार तासांचे मनुष्यबळ सार्थकी लावले. याशिवाय वर्तमानपत्रात दिलेल्या जागेचे मूल्य तर कित्येक लाखांमध्ये असेल, अशा प्रतिक्रिया या मोहिमेवेळी वाचकांनी दिल्या.

निवृत्त अधिकाऱ्यांची समिती -
लोकमत कारगिल सहाय्यता निधी संकलन आणि तिच्या विनियोगासाठी सेवानिवृत्त लेफ्टनंट कमांडंट पी. एन. मोडक हे अध्यक्ष तर विंग कमांडर टी. आर. जाधव (दोघेही औरंगाबाद) सचिव असलेली निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आली होती. विंग कमांडर आर. एस. बोरा. ले. कमांडंट पी. बी. केसकर (पुणे), कर्नल रमेश वाघमारे, मेजर जी. के. घुगे, कॅप्टन पी. आर. गाेखले, कर्नल व्ही. एल. वडोदकर (नागपूर) या मान्यवर निवृत्त अधिकाऱ्यांचा त्या समितीत समावेश होता.  
 

Web Title: Contribution of Rs 71 lakh for accommodation of personnel deployed in Kargil Checks handed over to Defense Minister by Lokmat Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.