तेलुगू चित्रपट समीक्षकास तेलंगणातून केले तडीपार, रामायणाविषयी वादग्रस्त वक्तव्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 05:02 AM2018-07-11T05:02:52+5:302018-07-11T05:03:09+5:30
तेलुगू चित्रपट समीक्षक काथी महेश यांना तेलंगण पोलिसांनी राज्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चेत रामायणासंबंधात काही वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप आहे.
हैदराबाद : तेलुगू चित्रपट समीक्षक काथी महेश यांना तेलंगण पोलिसांनी राज्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चेत रामायणासंबंधात काही वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप आहे. त्यांना त्यांच्या आंध्र प्रदेशातील गावात पाठवण्यात आले आहे. ही कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
काथी महेश यांनी राम, सीता, लक्ष्मण यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी करुन निदर्शनेही केली होती. काथी महेश यांनी आपल्या विधानानंतर परिपूर्णानंद सरस्वती यांच्याशी वाद घातला होता.
त्यानंतर परिपूर्णानंद व त्यांच्या समर्थकांनी हैदराबादमध्ये मोर्चा काढण्याचे ठरविले होते. त्यावर पोलिसांनी बंदी घातली. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडू शकते, समाजकंटक त्याचा गैरफायदा उठवू शकतात, यासाठी ही बंदी होती. आता परिपूर्णानंद सरस्वती यांनाही पोलिसांनी त्यांच्या घरीच स्थानबद्ध केले आहे. मात्र मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सरकार परिपूणानंद यांच्या हातचे बाहुले बनले आहे व त्यामुळेच काथी यांच्यावर ही कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे. (वृत्तसंस्था)