जेडीयूच्या बैठकीत वाद, जुने सहकारी नितीश कुमारांवर नाराज, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 01:10 PM2024-09-16T13:10:56+5:302024-09-16T13:13:07+5:30
JDU News: बिहारमधील सत्ताधारी आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या जेडीयूच्या प्रदेश कार्यालयात झालेला बैठकीत मोठा वाद उफाळून आल्याचं वृत्त समोर येत आहे.
बिहारमधील सत्ताधारी आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या जेडीयूच्या प्रदेश कार्यालयात झालेला बैठकीत मोठा वाद उफाळून आल्याचं वृत्त समोर येत आहे. सोमवारी जेडीयूच्या संघटनेची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान, जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी उफाळून आल्याचं वृत्त समोर आलं आहे. जेडीयूच्या कार्यालयातील कर्पुरी सभागृहामध्ये आयोजित बैठकीदरम्यान बिहार सरकारमधील मंत्री विजेंद्र प्रसाद यादव नाराज झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जुने सहकारी विजेंद्र प्रसाद यादव हे बैठकीची सूचना न देण्यात आल्याने तसेच पोस्टरवर फोटो न लावल्याने नाराज झाले. यादरम्यान, प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता ते आणखी संतप्त झाले. आम्हाला का बोलावलंय, आम्ही जनता दल युनायटेडमध्ये नाही आहोत, असे म्हणाले. दरम्यान, पोस्टरवर फोटो नसल्याने विजेंद्र प्रसाद नाराज झाले आणि त्यांनी असे विधान केले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, जेडीयूच्या या बैठकीमध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि इतर नेते उपस्थित होते. यादरम्यान, जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा, वशिष्ट नारायण सिंह, मंत्री बिजेंद्र यादव, अशोक चौधरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.