सुंदरतेमुळे चर्चेत आलेल्या हर्षा रिछारियामुळे वाद, 'या' एका कृत्यावरून संत मंडळी भडकली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:36 IST2025-01-16T11:35:30+5:302025-01-16T11:36:52+5:30
हर्षा निरंजनी आखाड्याच्या रथावर बसल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. याचा फोटोही व्हायरल झाला आहे. तिच्या या कृत्यावरून संतांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुंदरतेमुळे चर्चेत आलेल्या हर्षा रिछारियामुळे वाद, 'या' एका कृत्यावरून संत मंडळी भडकली!
प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर साधू-संत सहभागी झाले आहेत. यात अनेक जण आपल्या नोकऱ्या आणि सामान्य जीवन सोडून सन्यास घेत आहेत अथवा घेण्याचा विचार करत आहेत. यांपैकी एक नाव म्हणजे, हर्षा रिछारिया. हर्षा आधी मॉडेल आणि अँकर होती, ती आता साध्वीच्या रुपात महाकुंभमेळ्यात सहभागी झाली आहे. मात्र, आता यावरून वाद निर्माण झाला आहे. हर्षा निरंजनी आखाड्याच्या रथावर बसल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. याचा फोटोही व्हायरल झाला आहे. तिच्या या कृत्यावरून संतांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शाकंभरी मठाचे पीठाधीश्वर स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी व्यक्त केली नाराजी -
निरंजनी अखाडा 4 जानेवारीला महाकुंभमध्ये सहभागी झाला. यावेळी हर्षा रिछारिया संतांसोबत रथावर बसलेली होती. तिच्या या कृत्यावर आता बेंगळुरूमधील शाकंभरी मठाचे पीठाधीश्वर स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना, "यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. धर्माला प्रदर्शनाचा भाग बनवणे धोकादायक ठरू शकते. संत आणि ऋषींनी हे टाळावे, अन्यथा त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही व्यक्त केली नाराजी -
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही एक मॉडेलला रथावर बसवण्याला विरोध केला आहे. ते म्हणाले, "महाकुंभात अशी परंपरा सुरू करणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे विकृत मानसिकता दर्शवते. कुंभमेळ्यात रंगरुप, चेहऱ्याचे सौंदर्य नव्हे तर मनाचे, हृदयाचे सौंदर्य दिसायला हवे. जी व्यक्तीला अद्याप संन्यास घ्यायचा की विवाह करायचा, याचा निर्णय घेऊ शकत नाही, अशा व्यक्तीला संत आणि ऋषींच्या शाहीरथावर स्थान देणे योग्य नाही. ती भक्त म्हणून सहभागी झाली असती तर एकवेळ चालले असते. मात्र, तिचे शाही रथावर बसणे पूर्णपणे चुकीचे आहे."
तत्पूर्वी, हर्षाने आपण साध्वी नसल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण सुमारे अडीच वर्षांपूर्वी गुरूंकडून दीक्षा घेतली आहे. मात्र, अद्याप संन्यास घेण्यासंदर्भात अथवा लग्न करण्यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही, असेही तिने म्हटले आहे. तिने येथे अमृत स्नानही केले.