"दिव्यांग डॉक्टरच्या शस्त्रक्रियेवर विश्वास ठेवाल का"; महिला IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नाने नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 03:34 PM2024-07-24T15:34:41+5:302024-07-24T15:37:15+5:30
पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे दिव्यांग कोट्याची चर्चा होत असताना एका महिला अधिकाऱ्याने धक्कादायक विधान केलं आहे.
IAS Smita Sabharwal : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरण देशभरात गाजत असताना अनेक अधिकाऱ्यांची प्रकरणे चर्चेत आली आहेत. दिव्यांग असल्याचं खोट प्रमाणपत्र तसेच कोट्यवधींची संपत्ती असतानाही नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट मिळवून पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप आहे. एकीकडे हे प्रकरण गाजत असताना आणखी एक महिला आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महिला अधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांगांसाठीच्या नियमांनुसार नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाच्या वरिष्ठ अधिकारी स्मिता सभरवाल यांनी धक्कादायक विधान केलं आहे. स्मिता सभरवाल यांनी अखिल भारतीय सेवांमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षणाच्या गरजेवर प्रश्न उपस्थित केला आहे. यावरुन आता शिवसेना (उबाठा) खासदार प्रियांका चतुर्वेदी, दिव्यांग हक्क कार्यकर्ते आणि इतरांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे.
तेलंगणामधील वित्त आयोगाच्या सदस्या म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता सभरवाल यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन उपस्थित केलेला हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. "सध्या या चर्चेला जोर मिळत असल्याने मी सर्व दिव्यांगांबद्दल संपूर्ण आदर बाळगत लिहीते आहे की, विमान कंपन्या अपंगत्व असलेल्यांना वैमानिक म्हणून नियुक्त करतात का? किंवा तुम्ही सुद्धा शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर दिव्यांग असेल तर त्यावर विश्वास ठेवाल का? अखिल भारतीय सेवांमध्ये (आयएसएस/पीआयएस/पीएफओएस) सारख्या सेवांमध्ये प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन, अनेक तास सतत काम करणं, लोकांच्या तक्रारी थेट त्यांच्याकडून ऐकून घेणं यासारखी कामं असतात. यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. त्यामुळे या अग्रगण्य सेवेसाठी या कोट्याची काय गरज आहे?," असं स्मिता सभरवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
As this debate is blowing up-
— Smita Sabharwal (@SmitaSabharwal) July 21, 2024
With all due respect to the Differently Abled. 🫡
Does an Airline hire a pilot with disability? Or would you trust a surgeon with a disability.
The nature of the #AIS ( IAS/IPS/IFoS) is field-work, long taxing hours, listening first hand to…
स्मिता यांच्या या पोस्टवरुन ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी याला बहिष्कृत दृष्टिकोन म्हटलं आहे. “हा एक अतिशय दयनीय आणि अपमानजनक दृष्टीकोन आहे. नोकरशहा आपली मर्यादित विचारसरणी आणि विशेषाधिकार कसे दाखवतात हे पाहणे मजेशीर आहे," असे चतुर्वेदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
याप्रकरणी हैदराबादमधील इब्राहिमपट्टणम पोलीस ठाण्यामध्ये स्मिता सभरवाल यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिव्यांग हक्क गटाच्या समितीचे प्रदेश अध्यक्ष कार्यकर्ते जंगय्या यांनी ही तक्रार दाखल केली आहे.